प्रवाशाची गैरसोय भोवली

By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:14+5:302016-04-03T03:51:14+5:30

रेल्वेने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची गाडीत झालेली गैरसोय तसेच लांब अंतराच्या मार्गाचे दिलेले तिकीट दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला चांगलेच भोवले.

The inconvenience of the passenger | प्रवाशाची गैरसोय भोवली

प्रवाशाची गैरसोय भोवली

Next

ग्राहक मंचचा दणका : रेल्वेला २० हजारांचा दंड
गोंदिया : रेल्वेने प्रवास करीत असलेल्या प्रवाशाची गाडीत झालेली गैरसोय तसेच लांब अंतराच्या मार्गाचे दिलेले तिकीट दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेला चांगलेच भोवले. प्रवाशाच्या तक्रारीवरून ग्राहक मंचने दपूम रेल्वेला २० हजारांचा दंड ठोठावला. ग्राहक मंचने ३० मार्च रोजी हा निर्णय सुनावला आहे.
सविस्तर असे की, विनोद वल्लभदास माहेश्वरी (रा.तुमसर) यांना त्यांच्या कुटूंबासोबत महासमुंद येथून भोपाळ, रतलाम व मंदासोरमार्गे उदयपूर येथे जायचे होते. यासाठी त्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावरून ब्लँक पेपर तिकीट (बीपीटी) घेतली. रेल्वे त्यांना तिकीट देताना प्रवासाचे एकूण अंतर १९०९ किमी. दर्शवून संपूर्ण प्रवास भाडे आकारले. मात्र तक्रारदार माहेश्वरी यांच्या निदर्शनास आले की, महासमूंद ते उदयपूर हे जवळच्या मार्गाचे एकूण एंतर १३२६ किमी आहे. त्यामुळे त्यांना जवळच्या मार्गापेक्षा एकूण ५८३ किमी अंतराचा अतिरीक्त प्रवास करावा लागला.
रेल्वेच्या नियमानुसार ग्राहकाला जवळच्या प्रवासाच्या मार्गाप्रमाणे प्रवास भाडे आकारणे आवश्यक होते. तसेच बिलासपूर येथे झालेल्या रेल्वे विभागाच्या परीक्षेसाठी बोलाविण्यात आलेल्या एकूण ४५ हजार ८८७ उमेदवारांसाठी कोणतीही अतिरीक्त प्रवास व्यवस्था न करता आरक्षित बोगीतच त्यांनी प्रवास केला. यामुळे माहेश्वरी व त्यांच्या कुटूंबास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी त्यांनी जिल्हा ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी माहिती अधिकारातून बिलासपूर येथील परिक्षेसंबंधीची माहिती प्राप्त करून घेतली व रेल्वेचे विविध नियम व कायद्यांचा संदर्भ दिला. मंचने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतला. मात्र तक्रारदारास ५८३ किमी लांबच्या अंतराचे अतिरिक्त भाडे द्यावे लागले हे नकाशावरून सिद्ध झाले व यातून रेल्वेच्या सेवेत त्रुटी असल्याचे दिसले.
ग्राहक मंचने दपूम रेल्वेचे जनरल मॅनेजर (बिलासपूर) व गोंदिया रेल्वे स्टेशन प्रबंधकांना तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी २० हजारांचा दंड तसेच तक्रारीच्या खर्चापोटी १० हजारांचा दंड ठोठावला. हा आदेश ग्राहक मंचचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी जारी केला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The inconvenience of the passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.