लॉकडाऊन काळात फळांच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:58+5:302021-05-15T04:27:58+5:30
केशोरी : येथे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने तालुका प्रशासनाने लॉकडाऊन घोषित करून आवागमन करण्यासाठी संचारबंदीवर आळा घातला आहे. येथील ...
केशोरी : येथे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने तालुका प्रशासनाने लॉकडाऊन घोषित करून आवागमन करण्यासाठी संचारबंदीवर आळा घातला आहे. येथील बाजारपेठ बंद असल्यामुळे काही फळ विक्रेते घरच्या घरून फळे अधिकची किंमत आकारून विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन वाजवीपेक्षा अधिक पैसे घेऊन फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या महामारीत चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे फलाहार करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा फायदा घेत फळ विक्री करणारे दुकानदार आंबे, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब, चिकू, केळी, संत्री मूळ किमतीपेक्षा दुपटीने दर आकारून विक्री करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असली तरीही घरच्या घरून फळांची विक्री सुरू करून चुकीच्या पद्धतीने पैसे कमाविणाऱ्या दुकानदारावर पोलीस विभागाने कारवाई करून अंकुश लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.