ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:22+5:302021-04-17T04:28:22+5:30
प्रफुल्ल पटेल : नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करा गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात ...
प्रफुल्ल पटेल : नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करा
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर तसेच आरोग्य विषयक सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आ. राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात दररोज ६०० कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. परिणामी शासकीय आणि खासगी रुग्णालयात सुद्धा जागा अपुरी पडत आहे. खाटा कमी पडत असल्याने रुग्ण उपचारासाठी वेटिंगवर असल्याचे चित्र बिकट चित्र आहे. तर रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून त्यात त्वरित वाढ करण्याची गरज आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एकच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करण्यात यावी. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून १ कोटी ९० लाख रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तो लवकर सुरु झाल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही. मागील काही दिवसापासून रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करण्यात यावा. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजनची खरेदी करण्यात यावी. गोंदिया येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून आवश्यक सोयी सुविधा सुद्धा नाहीत. त्यामुळे नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असते. त्यामुळे या रक्तपिढीचे आधुनिकीकरण करण्यात यावे. अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम सुरु असून ते युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यावे. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ऑक्सिजनची समस्या दूर करण्यासाठी भिलाई येथून लिंक करण्यात यावे. आदी मागण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन यांनी लक्ष वेधले. कोरोना परिस्थिती आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन प्रयत्नात आहे.
.......
डाॅक्टरांची रिक्त पदे त्वरित भरा
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची दीडशेवर पदे रिक्त आहेत. यामुळे कोविड काळात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशात जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.
..............
लसींचा पुरेसा पुरवठा करा
कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.
.....
४०० बेडचे कोविड सेंटर सुरु करा
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात खाटांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे ४०० खाटांचे कोविड केअर त्वरित सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.
...........