ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:06+5:302021-04-17T04:29:06+5:30

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा ...

Increase health facilities in rural areas () | ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा ()

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा ()

Next

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर तसेच आरोग्य विषयक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आ. राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दररोज ६०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. परिणामी शासकीय आणि खासगी रुग्णालयातसुध्दा जागा अपुरी पडत आहे. खाटा कमी पडत असल्याने रुग्ण उपचारासाठी वेटिंगवर असल्याचे चित्र बिकट आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एकच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करण्यात यावी. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे तो लवकर सुरु झाल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करण्यात यावा. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजनची खरेदी करण्यात यावी. गोंदिया येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून आवश्यक सोयी सुविधासुध्दा नाहीत. त्यामुळे नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे या पीढीचे आधुनिकीकरण करण्यात यावे. अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम सुरु असून ते युध्द पातळीवर पूर्ण करण्यात यावे. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ऑक्सिजनची समस्य दूर करण्यासाठी भिलाई येथून लिंक करण्यात यावे. आदी मागण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधले. यावेळी गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, विनीत सहारे व पक्ष के पदाधिकारी उपस्थित होते.

.......

प्रफुल्ल पटेल यांची पालकमंत्र्याशी चर्चा

पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्याशी मोबाईलवरुन तब्बल २० मिनिटे चर्चा करुन जिल्ह्यात आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितले. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

....

लसींचा पुरेसा पुरवठा करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.

.....

Web Title: Increase health facilities in rural areas ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.