बीजीडब्ल्यूच्या इमारतीची उंची वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:04 AM2018-07-29T00:04:02+5:302018-07-29T00:04:46+5:30
येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी याची गांर्भियाने दखल घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील सिव्हिल लाईन्स परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या (बीजीडब्ल्यू) महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्यानंतर रुग्णांचे हाल झाले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधीनी याची गांर्भियाने दखल घेतली. रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले होते.दरम्यान या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनावर सर्वच स्तरातून टिका झाली.
या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांर्भियाने दखल घेत हा प्रकार घडण्यास नेमक्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपल्या अहवालात बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत ८० वर्षे जुनी असून ती जीर्ण झाली आहे.
रस्त्यांच्या उंचीच्या तुलनेत इमारतीची उंची कमी असल्याने रस्त्यावरील पाणी रुग्णालयाच्या वार्डात साचते. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीची उंची वाढविणे आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे.
इतर समस्यांचे काय
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत पाणी साचल्यानंतर प्रशासनाने त्याची गांर्भियाने दखल घेतली. मात्र जनरेटर, स्टोअर रुम, रूग्णालय परिसराची नियमित स्वच्छता या समस्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे रुग्णांचा त्रास काहीे प्रमाणात कायमच राहणार आहे. जनरेटरअभावी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र सुध्दा बरेचदा बंद असते, त्यामुळे ही समस्या देखील मार्गी लावण्याची गरज आहे.
अपडाऊन सुरूच
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचारी नागपूरवरुन दररोज अपडाऊन करतात. त्याचा परिणाम येथील रुग्ण सेवेवर होत आहे. विदर्भ एक्सप्रेस येईपर्यंत रुग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा करीत बसावे लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी काहीनी तक्रारी सुध्दा केल्या मात्र रुग्णालय प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाºयांचे अपडाऊन सुरूच आहे.
बीजीडब्ल्यू रुग्णालयात पाणी साचण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी दोन फूट भरण भरुन रुग्णालयाच्या इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरूवात केली जाईल. रुग्णालयाच्या इतर समस्या सुध्दा मार्गी लावू.
-व्ही.पी.रुखमोडे
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय