दहा दिवसांत प्रथमच मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:57+5:302021-03-08T04:27:57+5:30
गोंदिया : जिल्ह्यात दहा- पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र होते. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ...
गोंदिया : जिल्ह्यात दहा- पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र होते. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा दीडशेवर पोहोचला आहे. मात्र, रविवारी (दि.७) प्रथमच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आणि रुग्णसंख्या कमी, असे चित्र होते. मात्र, गोंदिया तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने उंचावत असल्याने जिल्हावासीयांची चिंता कायम आहे.
जिल्ह्यात रविवारी १५ बाधितांची नोंद झाली, तर २४ बाधितांनी कोरोनावर मात केली. रविवारी आढळलेल्या पंधरा रुग्णांमध्ये सर्वाधिक ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत, तर तिरोडा १ आणि आमगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७४,११९ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६२,०८० नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ७०,१७० जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६३,९४५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,५४५ कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १४,१९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १६० काेरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, २०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
२२ हजार कोरोनायोद्ध्यांना लसीकरण
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात पोलीस, महसूल विभाग आणि शिक्षकांनासुद्धा लसीकरण करण्यात आले. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २२,०९५ जणांना कोरोनाचा पहिला डोज, तर ३,४१७ जणांना कोरोनाचा दुसरा डोज देण्यात आला आहे.
..........
४ हजार ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या एकूण १७ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत चार हजार ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे.