स्क्रब टायफसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:29 AM2018-09-19T00:29:04+5:302018-09-19T00:29:36+5:30
सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. जिल्ह्यात या आजाराचे पुन्हा चार रूग्ण आढळले. या आजाराने जिल्ह्यात दोन महिलांचा बळी घेतला. जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. जिल्ह्यात या आजाराचे पुन्हा चार रूग्ण आढळले. या आजाराने जिल्ह्यात दोन महिलांचा बळी घेतला. जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ११ वर पोहचली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात स्क्रब टायफसने पाय पसरले आहे.
आमगाव व देवरी तालुक्यात रूग्णच आढळले नाही, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव, सालेकसा व तिरोडा या चार तालुक्यात स्क्रब टायफसचे रूग्ण आढळले होते. आता पुन्हा गोंदिया व गोरेगाव या दोन तालुक्यात या आजाराचे रूग्ण आढळले आहेत.
ज्या गावात हे रूग्ण आढळले त्या गावात साथरोग अधिकारी डॉ.बी.आर.पटले व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी त्या गावात भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजना कश्या कराव्यात यासंदर्भात मार्गदर्शन करीत आहेत. गोंदिया जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतू खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या खासगी डॉक्टर शासकीय आरोग्य यंत्रणेला देत नाही किंवा शासकीय यंत्रणा त्या खासगी डॉक्टरांकडील रूग्णांची माहिती बरोबर संकलीत करीत नाही. आपले अपयश दिसू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या कमीत कमी दाखवित आहे.
अर्जुनी-मोेरगाव तालुक्याच्या केशोरी येथील भावना दयाराम शेंडे (२३) यांना ३१ आॅगस्ट रोजी या आजाराने पछाडले. गोंदियाच्या गौतमनगरातील उर्मिला अशोक रामटेककर (४६) यांना ३ सप्टेंबर रोजी स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
तिरोडा तालुक्याच्या लोहारा (नवेझरी) येथील वसुधा बांते (४०) यांना १२ सप्टेंबर रोजी हा आजारा असल्याचे लक्षात आले. तर १७ सप्टेंबर रोजी गोरेगाव तालुक्याच्या पठाणटोला (तिल्ली) येथील दोसेंद्र पृथ्वीराज पारधी (१८) यांना हा आजार असल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यांना गोंदियातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी सात जणांना हा आजार झाला आहे.
खासगी रूग्णालयातील रूग्णांची संख्या मागवा
शहरातील खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या बहुतांश रूग्णांची माहिती शासकीय आरोग्य संस्थेला नाही. गोंदियातील सर्व रूग्णालयात स्क्रब टायफसचे दररोज किती रूग्ण दाखल झाले.याची माहिती संकलीत करण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला प्रत्येक रूग्णालयात पाठवावे. इमाने- इतबारे खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या रूग्णांची माहिती घेतल्यास ही संख्या शेकडोच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही. असे एका डॉक्टरने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. काही खासगी डॉक्टर माहिती देत नाही व आकडा फुगू नये म्हणून आरोग्य विभागही मागे-पुढे पाहात आहे.
माहिती देणे बंधनकारक करावे
खासगी रूग्णालयात उपचार घेणाºया डेंग्यू व मलेरियाच्या रूग्णांची माहिती शासकीय आरोग्य संस्थेला देण्याचे बंधनकारक करण्यात आले. परंतु स्क्रब टायफसच्या आजाराची माहिती शासकीय आरोग्य संस्थेला देणे बंधनकारक नसल्यामुळे खासगी रूग्णालय या आजारच्या रूग्णांची माहिती देत नाहीत. या रूग्णांची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणेला देण्याचे बंधनकारक करण्याची गरज आहे.