जिल्ह्यात स्वाईन फ्लू रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:24 PM2017-09-20T22:24:17+5:302017-09-20T22:24:30+5:30
मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोन जणांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला. सालेकसा येथे बुधवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला.यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील आठ दिवसांच्या कालावधीत दोन जणांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू झाला. सालेकसा येथे बुधवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला.यामुळे जिल्ह्यावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
बदलत्या वातावरणामुळे साथ रोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे. महिनाभरापूर्वी सडक/अर्जुनी तालुक्यातील फुटाळा एका रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी अर्जुनी मोरगाव येथील एका महिलेचा आणि बुधवारी (दि.२०) आमगाव येथील एका तरुणीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील तीन जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अर्जुनी-मोरगाव, सडक-अजुनी, गोरेगाव, सालेकसा या तालुक्यांमध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील स्वाईन फ्लूची प्रतिबंधकात्मक लस उपलब्ध नसल्याचे बोलल्या जाते. एकीकडे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे कुठल्याच उपाययोजना सुरू न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोष मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
खोकतांना किंवा शिंकतांना तोंडावर रु माल घ्या. रोगी व्यक्तीने वापरलेले रु माल, टॉवेल, कपडे इत्यादीचा वापर करु नये. साबण व पाण्याचा वापर करु न वारंवार हात धुवावे. सर्दी, खोकला यासारखे लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्दी, खोकल्याचा संसर्ग झाल्यास जास्त लोकांच्या गर्दीत जाणे टाळावे व घरच्या घरी राहण्याचा प्रयत्न करावा.
स्वाईन फ्लूची प्रतिबंधात्मक लस बाहेरुन खरेदी करावी लागते.मात्र स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्या सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
- डॉ.रुखमोडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.
जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण असून प्रशासनाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्यात. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडू.
- सहसराम कोरोटे, जिल्हा महासचिव काँग्रेस.