वनांच्या संवर्धनाने वन्यजीवांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 09:47 PM2018-05-12T21:47:28+5:302018-05-12T21:47:28+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यात वन्यजीव व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचे पाझिटीव्ह परिणाम दिसायला आता सुरूवात झाली आहे. वनांच्या संवर्धनामुळे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्यात वन्यजीव व विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचे पाझिटीव्ह परिणाम दिसायला आता सुरूवात झाली आहे. वनांच्या संवर्धनामुळे नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीवांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक वाढ झाल्याची बाब अलीकडेच झालेल्या प्राणी गणनेनंतर पुढे आली आहे. वन्यजीव प्रेमींसाठी निश्चित ही बाब दिलासादायक आहे.
येथील राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर झोनमध्ये बुध्द पौर्णिमेला करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेत दोन पट्टेदार वाघासह, ५ बिबट, ५५५ रानगवे, २८ चितळ, ५१ सांबर, ३६ चौसिंगा, १०४ निलगायसह २६४४ वन्यप्राण्यांची नोंद झाली. मागील वर्षी १६७४ वन्यप्राण्यांची नोंद झाली होती. या वर्षीच्या वन्यप्राणी गणनेत ९७० वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. तर वाघ, बिबट, रानगवे, सांबर या प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.
राष्ट्रीय उद्यानात २९ व ३० एप्रिलला बुध्द पौर्णिमेच्या रात्री ही वन्यप्राणी गणना करण्यात आली. यासाठी ४० पाणवठ्यावर ४० मचानी यासाठी उभारण्यात आल्या होत्या. प्राणी गणनेसाठी १ उपविभागीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्राधिकारी २, ४ क्षेत्रसहायक, १७ वनरक्षक, तीन पर्यटक, १४ वनमजूर, ५२ हंगामी मजूर अशा एकूण ९० प्रगणकांनी वन्यप्राण्यांची गणना केली. तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही वन्यप्राणी गणना राष्ट्रीय उद्यानाच्या १३३.८८ चौरस किलो मीटर परिसरात पसरलेल्या कोअर झोनमध्ये करण्यात आली. मागील वर्षीच्या गणनेत १ वाघ, २ बिबट, २८५ रानगवे, ४४ चितळ, २१ सांबरासह १६७४ वन्यप्राण्यांची नोंद झाली होती. तर यंदा २९ एप्रिलच्या १० वाजेपासून ते ३० एप्रिलच्या सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या वन्यप्राणी गणनेत २ वाघ, ५ बिबट, ५५५ रानगवे, २८ चितळ, ५१ सांबर, ३६ चौशिंगा, १०४ निलगाय, ५१ मोर, ३५३ लाल तोंडे माकड, ९९६ काळेतोंडे माकड, १६ मेडकी, ३६ अस्वल, ३७७ रानडुकरे, २ रानमांजर, १ सायाळ, २८ रानकुत्रे, ३५ ससे, ३५ घोरपड, १० झाड विंचू यासह २६४४ वन्यप्राण्यांची नोंद झाली.खोलीग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या माध्यमातून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, पिटेझरी, नागझिरा येथील प्रगणकांसाठी व्यवस्था करण्यात आली.सर्वच प्रगणकांनी उत्तम सहकार्य केले. प्रगणकांच्या सुरक्षततेची काळजी विभागाकडून घेण्यात आली. राष्ट्रीय उद्यानाच्या राखीव वनांमध्ये मानवी वावर लाकडासाठी व इतर गोष्टीसाठी वाढू नये, म्हणून राष्ट्रीय उद्यान परिसरातील गावात शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.
एलपीजी गॅसचे वितरण, गावातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षण या गावातील महिला बचत गटाचा संघ तयार करुन कॅटरींग तसेच तत्सम व्यवसायासाठी प्रोत्साहीत करुन लघु उद्योगाची उभारणी करणे, शेतीला सोलर कुंपण, दुधाळ गाईचे वाटप करुन या कुटूंबाना रोजगार उपलब्ध करुन दिले जात आहेत. गाभाक्षेत्र लगतचे (कोअर झोन) गावातील लोक अवैध लाकूड, बांबू व अन्य कामासाठी राखीव वनात जाणार नाही, यासाठी त्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.
गावात कार्यशाळा, शिबिर घेऊन विद्यार्थी, नागरिक, महिलांशी संवाद साधून वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन या विषयीची जनजागृती वन्यजीव संरक्षण विभागाकडून केली जात आहे. गाभा क्षेत्रातील गावातील गावकºयांचे सहकार्य मिळत आहे.
या वन्य प्राण्यांचा अभाव
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात बुध्द पोर्णिमेला घेण्यात आलेल्या प्राणी गणनेत चांदी अस्वल, मुंगूस, मसन्याउद, घुबड, तळस, खवल्या मांजर यांची नोंद झाली नाही. त्यामुळे या उद्यानात या वन्यप्राण्यांचा अभाव दिसून आला.
उपाय योजनांमुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रातील (कोअर झोन) लगतच्या गावाील लोकांचा राखीव जंगलातील मानवी वावर व हस्तक्षेप कमी झाला. या राखीव जंगलातील कालीमाटी, कवलेवाडा व इतर भागात गवताचे कुरणक्षेत्र वाढले, ३३ कृत्रीम पाणवठे वन्यप्राण्यांसाठी तयार करण्यात आले. पाणवठ्यांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी, चाºयासाठी इतरत्र भटकावे लागत नाही. त्यामुळेचवन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.