वातावरण बदलाने रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:06 PM2019-04-15T22:06:39+5:302019-04-15T22:06:57+5:30
मे महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने जीवाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फीव्हर व उष्माघाताची लक्षणे दिसत असल्याने लगेच औषधोपचार करणे गरजेचे झाले आहे. उन्हाचा तडाखा आणि आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मे महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हाचा पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने जीवाची काहिली होत आहे. वाढत्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. व्हायरल फीव्हर व उष्माघाताची लक्षणे दिसत असल्याने लगेच औषधोपचार करणे गरजेचे झाले आहे. उन्हाचा तडाखा आणि आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ वाजतापासून रस्ते भकास होतात. तापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्री वाढली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्याही सुगीचे दिवस अनुभवत आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचा काळ असला तरी बहुतांश लोक पंखे, कुलरच्या गारव्यात दुपारी घरीच राहणे पसंत करतात. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे टरबूज, अननस, अंगूर, खरबूज आदी पाण्याचे प्रमाण अधिक असलेल्या फळांची तसेच काकडी, निंबू, पालेभाज्या यांचीही मागणी बाजारात वाढल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या तापमानात काकडी, टरबूज, अंगूर ही फळे वापरल्याने पाण्याची कमतरता भरून काढणे शक्य आहे. जलजन्य फळांची वाढती मागणी लक्षात घेता बाजारात फळविक्रेते सर्वच प्रकारची फळे विक्रीस ठेवून ग्राहकांची गरज भागवित असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश फळे कार्बाइडने पिकविली जात असली तरी मगजदार पिवळी टेंभर, आंबटगोड चवीच्या खिरण्या बेपत्ता असल्याचे दिसून येते. यामुळे आरोग्याला रानमेवा मिळणे कठीण झाले आहे.
वाढत्या उन्हामुळे डोक्याला बांधावयाचे दुपट्टे, स्कार्फ व टोप्यांची मागणी वाढली आहे. उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करणारे सनगॉगल्स मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. यावर्षी आॅनलाईन खरेदीला युवक, महिला अधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. विविध संकेतस्थळाच्या माध्यमातून वस्तू बोलविण्यावर अधिक भर दिसून येत आहे.
यामुळे बाजारात या वस्तूंना अधिक उठाव नसला तरी आॅनलाईन बाजार मात्र फुलल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे विषाणूजन्य आजारांसह उष्माघाताचे रूग्णही आढळून येत आहेत. यामुळे अधिक उन्हात जाण्याचे टाळले पाहिजे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करतात.
अधिक पाणी पिणे गरजेचे
रूग्णांच्या संख्येत विशेष वाढ झाली नसली तरी उष्माघाताचे रूग्ण आढळून येत आहेत. बालकांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने हगवण, उलटी, पोटदुखी आदी विकार दिसून येत आहे. हे टाळण्यासाठी बालकांना उन्हात अधिक वेळ खेळू न देणे, बाहेर घेऊन न जाणे, अधिक पाणी पिणे हे उपाय करणे गरजेचे आहे.
जलयुक्त फळांच्या विक्रीत वाढ
तापमानात वाढ झाल्याने शीतपेयांची विक्रीही कमालीची वाढली आहे. शहरातील चौक, रस्त्यांवर असलेल्या रसवंत्यांमध्ये नागरिकांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या ऊसाच्या रसाच्या बंड्यांनाही सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. शिवाय बर्फगोले, कुल्फी आदींच्या विक्रीतही वाढ झाली आहे.