गाळाने उत्पादन क्षमता वाढवा
By admin | Published: May 11, 2017 12:17 AM2017-05-11T00:17:43+5:302017-05-11T00:17:43+5:30
गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. पुर्वजांनी बांधलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
अभिमन्यू काळे : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया तलावांचा जिल्हा आहे. पुर्वजांनी बांधलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. साचलेला गाळ हा सुपीक असून शेतकरी बांधवांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेतून तलावातील गाळ शेतीत टाकून शेतीची उत्पादन क्षमता वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार (दि.९) रोजी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या बाबत घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जि.प.लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता पाथोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काळे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील धरणे व तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. हा गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकून व शेतीची उत्पादकता वाढवून पाणीसाठा मुबलक करून घेण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत शाश्वत स्वरूपात वाढ होईल, तसेच पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तलावातील गाळ शेतकऱ्यांच्या शेतात घेवून जाण्याचे नियोजन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी करावे, असे ते म्हणाले.
जलसंधारण विभागाने जिल्ह्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करावे असे सांगून काळे म्हणाले, या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी गाळ मागणीचे अर्ज करावे. हा गाळ घेवून जाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मुख्य चौक व तलाव परिसरात या बाबतच्या प्रसिध्दीविषयक फ्लेक्स लावून गाळ घेवून जाण्यास प्रवृत्त करावे. उद्योग समुहाच्या उत्तरदायित्वातूनसुध्दा या योजनेंतर्गत कामे करावी. ज्या तलाव खोलीकरणाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, ते तलाव सोडून प्रत्येक तालुक्यातील ५० तलावांचा गाळ काढावा. गाळ काढताना सर्व तलावांचे छायाचित्र काढावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या वेळी शिंदे यांनी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेविषयी माहिती दिली. पाथोडे यांनी जिल्हा परिषदेकडे १०० हेक्टरचे एक हजार ४२१ माजी मालगुजारी तलाव असून गोंदिया पाटबंधारे विभागाकडे १०० हेक्टरवरील ३८ तलाव व स्थानिक स्तर यांच्याकडे २५० हेक्टर पर्यंतचे २९ तलाव असल्याची माहिती दिली.
सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी भीमराव फुलेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक वाय.एस. वालदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, सिध्दार्थ भंडारे, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे सर्व उपअभियंते तसेच संबंधित यंत्रणांचे अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
४१८ तलावातील गाळ काढा
जिल्ह्यातील सर्वच आठही तालुक्यातील ४१८ तलावांतील गाळ काढावा. ज्या शेतकऱ्यांनी तो गाळ शेतीच्या उपयोगात आणला असेल त्या शेतीची उत्पादकता निश्चितच वाढलेली असेल. गाळ शेतात टाकणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वतंत्र याद्य तयार कराव्या व त्या उपलब्ध करून द्याव्यात. या ४१८ तलावाव्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात ५० तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन देखील करावे, असेही या वेळी काळे म्हणाले.