जिल्ह्यात आणखी सहा कन्टेन्मेंट झोनची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:43+5:302021-04-13T04:27:43+5:30
जिल्ह्यातील बाधितांची संख्या सोमवारी ५८१ बाधित निघाल्यानंतर क्रियाशील रुग्णसंख्या ४,८८८ झाली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात ...
जिल्ह्यातील बाधितांची संख्या सोमवारी ५८१ बाधित निघाल्यानंतर क्रियाशील रुग्णसंख्या ४,८८८ झाली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून, त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद्भवू नये, यासाठी आता कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात एकूण २० कन्टेन्मेंट झोन होते. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात वाढ करून शनिवारी (दि. १०) ३, तर रविवारी ११ कन्टेन्मेंट झोन वाढविण्यात आले होते.
मात्र बाधितांची संख्या वाढतच चालली असून, घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. यामुळे काही परिसरांमध्ये बाधित वाढताना दिसून येत आहेत. अशात सोमवारी (दि.१२) आणखी सहा कन्टेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण कन्टेन्मेंट झोनची संख्या ४० झाली आहे.
-----------------------------
शहरात धोका वाढतोय
जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची संख्या गोंदिया शहर व तालुक्यात आहे. यातही शहरातील संख्या जास्त असल्याने आता शहरातील धोका वाढत चालला आहे. हेच कारण आहे की, शहरात आता दहा कन्टेन्मेंट झोन झाले आहेत. शनिवारी कालीबाडीत कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले असतानाच आता बाजपेयी वॉर्डातही कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, येथे सात कोरोनाबाधित आहेत.
-----------------------------
एकच उपाय ‘घरी रहा-सुरक्षित रहा’
जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करीत आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे नाहक नागरिकांचा जीवही जात आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास येणारे दिवस कठीण राहतील. यामुळे आता तरी नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ या मंत्रावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.