चार महिन्यात देणार करवसुलीवर जोर
By admin | Published: November 22, 2015 02:04 AM2015-11-22T02:04:24+5:302015-11-22T02:04:24+5:30
यावर्षी गोंदिया नगर परिषदेची करवसुली अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मुख्याधिकारी ...
मुख्याधिकाऱ्यांनी घेतली बैठक : मागील रेकॉर्ड ब्रेक करण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन
गोंदिया : यावर्षी गोंदिया नगर परिषदेची करवसुली अतिशय संथगतीने सुरू असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ यांनी करवसुली विभागाची बैठक तातडीने बोलाविली. यावेळी आर्थिक वर्षाच्या उरलेल्या चार महिन्यात मागील वर्षापेक्षा जास्त करवसुली करून मागील वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी त्यांनी स्वत: मैदानात उतरण्याचीही तयारी सुद्धा दर्शविल्याची माहिती आहे.
पालिकेला आजघडीला पाच कोटी ५१ लाख सात हजार ११६ रूपये थकीत चार कोटी १४ लाख ३४ हजार ८७६ रूपये चालू (सन २०१५-१६) अशाप्रकारे एकूण नऊ कोटी ६५ लाख ४१ हजार ९९२ रूपयांची कर वसुली करावयाची आहे. यात पालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांच्या काळात ७४ लाख चार हजार २१४ रूपये थकीत व ४० लाख १५ हजार ७८७ रूपये चालू अशी एकूम एक कोटी १४ लाख २० हजार एक रूपयांची वसुली केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कर वसुली पथकासह खुद्द मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना सुद्धा मैदानात उतरावे लागले होते. परिणामी मागील वर्षी पालिकेची ५१.७२ टक्के करवसुली झाली होती. त्यामुळे यंदा कर वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून काय पाऊल उचलले जाते यावर यंदाची कर वसुली अवलंबून आहे.
याबाबत ‘लोकमत’ने शनिवारी (दि.२१) बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला. तसेच मागील वर्षी कर वसुली विभाग प्रभारी चालवित असताना यंदा कर निरीक्षक आहेत. त्यासोबत मुख्याधिकाऱ्यांची मिळालेली साथ या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. या बातमीची दखल घेऊन मुख्याधिकारी वाहूरवाघ यांनी विविध विभागांसह कर वसुली विभागाची बैठक बोलाविली. या बैठकीत त्यांनी कर वसुली वाढवून मागील वर्षीचे रेकॉर्ड तोडण्यावर भर दिल्याची माहिती आहे. शिवाय ते स्वत: कर वसुलीसाठी मैदानात उतरणार असल्याचीही माहिती मिळाली. (शहर प्रतिनिधी)