आरक्षण सोडतीनंतर वाढला उमेदवारीचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 05:00 AM2021-12-25T05:00:00+5:302021-12-25T05:00:12+5:30
आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. ओबीसी जागा सर्वसाधारण करून या जागांसाठी ५० महिला आरक्षणाकरिता गुरुवारी (दि.२३) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही जागा महिलांसाठी राखीव झाल्याने या ठिकाणी उमेदवारी देण्याचा पेच पक्षासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर पक्ष कोणता रामबाण इलाज शोधते हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून या जागा सर्वसाधारण करून निवडणूक घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १८ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली, तर २९ जानेवारीपासून या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.
मात्र, आरक्षणादरम्यान निंबा, पांढरी, इटखेडा आणि किकरीपार या जागांचे समीकरण बदलल्याने या ठिकाणी आता दुसऱ्या उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांचे या जागांसाठी पक्षाने निश्चित केले होते त्यांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. त्यामुळे या जागांवरून पेच निर्माण झाला असून, यावर कुठला तोडगा काढला जातो याकडे लक्ष लागले आहे.
उमेदवारीकडे लक्ष
- ३० जागांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चित केले होते; पण आरक्षणामुळे त्यात थोडाफार बदल झाला असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष आहे.
जागा सर्वसाधारण, पण उमेदवार ओबीसीच
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाले असले तरी या जागांवर ओबीसी उमेदवारांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय सर्वच राजकीय पक्षांनी घेतला होता. त्याच निर्णयानुसार या जागांवर ओबीसी उमेदवारांना संधी दिली जात आहे. मात्र, यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे अनेकांची नाराजी पक्षाला सहन करावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी
- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी २९ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ४ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे.