चाचण्यांच्या विलंबामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:32+5:302021-04-28T04:31:32+5:30
केशोरी : परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ...
केशोरी : परिसरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
गावागावांत कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून, कोरोनाचे निश्चित निदान होण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी ही महत्त्वाची आहे. परंतु या चाचणीचे केंद्र जिल्हास्थळी असल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी कोरोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. या चाचणीचे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू केल्यास मोठी मदत होईल. केशोरी परिसरात कोरोनाने कहर केला आहे. निदान करण्यासाठी अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या प्रचलित आहेत. अँटिजेन चाचणीचा रिपोर्ट दहा मिनिटांत रुग्णांना समजतो, परंतु त्या चाचणीवर विश्वास नाही त्यामुळे कोरोना संसर्गाचे रुग्ण आरटीपीसीआर चाचणी करण्याचा आग्रह धरतात. या चाचणीचे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जिल्हास्थळी असलेल्या आरटीपीसीआर चाचणी केंद्रात पाठविले जातात. जिल्हा ठिकाणावरून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी या काळात आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती सामान्य व्यक्तीसारखी गावात फिरत असल्यामुळे त्यापासून कोरोनाचा संसर्ग जास्त वाढत आहे. त्याकरिता आरटीपीसीआर चाचणीचे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करावे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींवर त्वरित उपचार होण्यास मदत होईल. यामुळे कोरोनाच्या वाढणाऱ्या संसर्गावर आपोआप आळा बसेल.