स्टेट बँकेतील प्रिंटर्स मशीन बंद ग्राहकांचा वाढला मानसिक त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:05+5:302021-02-14T04:27:05+5:30
तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी-मोरगाव येथे असलेल्या स्टेट बँकेत केशोरी परिसरातील अनेक शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी बचत गटांच्या महिला आणि निराधारांची बँक ...
तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी-मोरगाव येथे असलेल्या स्टेट बँकेत केशोरी परिसरातील अनेक शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी बचत गटांच्या महिला आणि निराधारांची बँक खाती आहेत. तालुक्यातून इतर कुठेही स्टेट बँकेची दुसरी शाखा नसल्यामुळे खातेदारांची गर्दी होत असते. बँकेचे व्यवहार होण्यासाठी आपल्या बँक पासबुकमध्ये अखेरची शिल्लक पाहण्यासाठी पासबुक प्रिंट करण्यासाठी मशीन लावण्यात आली आहे; परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सदर बँकेतील प्रिंट मशीन बंद असल्यामुळे आपल्या खाती शिल्लक किती आहेत, हे पाहण्यासाठी खातेधारकांना अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात येथील कर्मचाऱ्यांना विचारले असता उर्मट उत्तर देऊन खातेधारकांना परत पाठवीत असतात, अशी ग्राहकांची तक्रार आहे. या परिसरामधून दररोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी अर्जुनी-मोरगाव येथे जावे लागते. त्याच कामामधून बँकेतील विड्राल करून परत जावे, या उद्देशाने बँकेतील खात्यात शिल्लक किती आहे, याची पडताळणी करण्यासाठी प्रिंट मशीन बंद असल्यामुळे ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बंद असलेली प्रिंटर मशीन दुरुस्त करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.