मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:05+5:302021-05-09T04:30:05+5:30
नरेश रहिले गोंदिया : कोरोनाने विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तांचा ...
नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाने विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्तांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. कोरोनानंतर येणारा फेज आत्महत्यांचा राहणार आहे. कोरोनामुळे नोकरी गेली, आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यामुळे जगायचे कसे? हा महत्त्वाचा प्रश्न लाखो लोकांना भेडसावत आहे. आम्ही जगायचे कसे? याच विवंचनेत लोक गुरफटून आहेत.
जगात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. हा आकडा युद्धात जीव गमावलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त आहे. प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंबे आप्तांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपल्या उदरनिर्वाहाचे साधन कोरोनामुळे गमवावे लागले आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. यातून आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले असून, त्यातून आत्महत्या थांबविल्या जाणार असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ तथा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ. लोकेश चिरवतकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
.....................
कोण म्हणतो, पुरुष व्यक्त होत नाही?
कोरोनाच्या महामारीनंतर दुसरी लाट आत्महत्येची येणार आहे. यासंदर्भात जगभर चर्चा व्हावी आणि आत्महत्या थांबविता याव्यात, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जानेवारी २०२० च्या ‘द हिंदू’च्या सर्व्हेनुसार, एका तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. भारतात वर्षाकाठी २५ हजार विद्यार्थी आत्महत्या करतात. भारतीय सांख्यिकी विभागानुसार १५ ते २९ या वयोगटातील मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आत्महत्या हे आहे. आपल्या मनातील दु:ख पुरुषही व्यक्त करायला लागले आहेत.
.......................
पुरुष सर्वाधिक तणावात असतात
पुरुषांच्या आत्महत्येची कारणे आर्थिक आणि सामाजिक असतात. महिलांची कारणे भावनिक असतात. पुरुषांच्या आत्महत्येमुळे मरणाचे प्रमाण महिलांच्या तुलनेत दुप्पट आहे. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते आणि त्यातून आत्महत्या करतात.
.........
तरुणांचे प्रश्न वेगळेच
१) तरुण वयातच कोरोनामुळे जॉबलेस झालेल्या तरुणांच्या अंगी नैराश्य येत आहे. त्या नैराश्येमुळे पुढचे आयुष्य कसे जगणार, याचा आटापिटा करीत असलेली तरुण मंडळी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत.
२) तरुणांमध्ये व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वांत मोठे आत्महत्येसाठी कारण आहे. दारूमुळे व्यक्तींची सारासार विचार करण्याची क्षमता कमी होत जाते. मेंदूत बदल होतात. त्यामुळे हे आत्महत्या करतात. दारूमुळे तरुण डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करतात.
३) शारीरीक, मानसिक आणि सामाजिक तणाव, दुर्धर आजारांमुळे खचून जाऊन आत्महत्या केल्या जातात. तणाव व कौटुंबिक कलह हे सर्वात मोठे आत्महत्येचे कारण आहे. डिप्रेशन, सिजोप्रेमीया (संशयाचा आजार), मेनिया (कभी खुशी, कभी गम) या मानसिक आजारांमुळेही आत्महत्या होत असतात.
.............................
१०४ हेल्पलाईनवरून करा समस्यांचे समाधान
व्यसनांमुळे आत्महत्या वाढतात. दारू हे सर्वात मोठे आत्महत्येसाठी कारण आहे.
यासंदर्भात आत्महत्येची पाळी कुणावरही येऊ नये, यासाठी कुटुंबियांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकार, प्रसारमाध्यम व जनता या तिघांनी मिळून आत्महत्या प्रतिबंध करण्याची गरज आहे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता आदी चमू यात निदान आणि उपचार मोफत दिले जात आहेत. कुणाला गरज पडल्यास १०४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून सामान्य जनता आपल्या समस्येसंदर्भात मार्गदर्शन घेऊ शकतात.
.................
कोट
१८ वर्षांखालील जे आत्महत्या करतात, ते शिक्षणासंदर्भात वाढती स्पर्धा, अभ्यासाचा तणाव, त्यांची कमकुवत सहनशिलता, पब्जी व सोशल मीडियाचे जडलेले व्यसन यातून अल्पवयीन विद्यार्थी आत्महत्या करतात. प्रत्येकाला औषधाची गरज नसते. फक्त समुपदेशन (कौन्सिलिंगच्या) माध्यमातून त्याच्या तणावाचे निवारण केले जाऊ शकते. एखादा व्यक्ती बोलत नाही, तर त्याच्या हावभावावरून किंवा हालचालींवरून आपल्याला सहज समजते. आणि तो तणावात आहे, त्याची विचारपूस करणे आवश्यक आहे. - डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.
.........................
गेल्या वर्षभरात हेल्पलाईनवर आलेले कॉल - २२०००
महिला - ४०००
पुरुष - १८०००