डॉक्टरांअभावी आरोग्य केंद्रात वाढल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:20+5:30
असाच प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आहे. दवाखान्यात सतत २५ वर्ष सेवा देणारे डॉक्टर डुंभरे हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून दुसरा डॉक्टर पाठविण्यात आला नाही. तसेच दोन महिन्यां अगोदर याच दवाखान्यात विंचूरकर नावाचे डॉक्टर रुजू झाले होते. मात्र ते दोन महिन्यांतून एक महिनाही सेवा न देता रजेवर गेले व परतलेच नाही.
वामन लांजेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : खेड्यापाड्यातील जनतेला आरोग्याची उत्तम सेवा मिळावी या हेतूने शासनस्तरावर ठिकठिकाणी दवाखाने उघडण्यात आले आहेत. मात्र कधी डॉक्टरांची कमतरता तर कधी औषधांचा अभाव यामुळे जनतेला आरोग्य सेवेचा लाभ वेळेवर मिळत नाही. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्याची वाट धरावी लागते.
असाच प्रकार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आहे. दवाखान्यात सतत २५ वर्ष सेवा देणारे डॉक्टर डुंभरे हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाकडून दुसरा डॉक्टर पाठविण्यात आला नाही. तसेच दोन महिन्यां अगोदर याच दवाखान्यात विंचूरकर नावाचे डॉक्टर रुजू झाले होते. मात्र ते दोन महिन्यांतून एक महिनाही सेवा न देता रजेवर गेले व परतलेच नाही. त्यामुळे सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर दोनोडे सेवा देत आहेत. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा उपकेंद्र व २७ गावांचा समावेश आहे. सदर परिसर आदिवासी बहुल, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असल्याने येथे कोणताही डॉक्टर यायला तयार नाही याचे अनेक उदाहरण आहेत. केंद्रात अनेक वर्षांपासून औषध निर्माता, परिचर, एन.एम, क्लर्क व आरोग्य सहायकाचे पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होते. आरोग्य केंद्रात वेळी अवेळी प्रसुतीसाठी महिला येतात. तसेच कुटूंब नियोजनांंतर्गत शस्त्रक्रियेसाठी दूरवरुन महिला मोठ्या प्रमाणात भरती होतात. मात्र त्यांना पुरेशी सेवा उपलब्ध होत नसल्याची रुग्णांच्या नातेवाईकांची ओरड आहे. सध्या केंद्रात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. रुग्णांचे नातेवाईक पिण्याच्या पाण्यासाठी दारोदारी भटकतांना दिसतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच महिला रुग्णांच्या तपासणीसाठी महिला डॉक्टर नसल्याने नाईलाजाने पुरुष डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी लागते.
प्रशासनाकडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या सभा, सर्व्हेक्षण, शिबिर, कार्यालयीन रेकार्ड व बाह्य रुग्ण सेवेचा कार्यभार एकाच डॉक्टरवर अवलंबून असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळेलच याची शाश्वती नाही. परिणामी ‘रेफर टू गोंदिया’ हा मंत्र राबविला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल.