२२५ रुपये वाढविले अन् १० रुपये कमी केले : व्वा रे चलाखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:51+5:302021-04-04T04:29:51+5:30

गोंदिया : मागील वर्षीपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांवर जाऊन पोहचले असून ...

Increased by Rs 225 and reduced by Rs 10: Wow Ray cunning | २२५ रुपये वाढविले अन् १० रुपये कमी केले : व्वा रे चलाखी

२२५ रुपये वाढविले अन् १० रुपये कमी केले : व्वा रे चलाखी

Next

गोंदिया : मागील वर्षीपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गॅस सिलिंडरचे दर ९०० रुपयांवर जाऊन पोहचले असून त्यावरील सबसिडी मात्र कमी केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडत आहे. तर महिनाभराचा खर्चाचा ताळमेळ बसविताना गृहिणीची दमछाक होत आहे.

१ एप्रिल रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर लागू झाले. त्यात दहा रुपये कमी करण्यात आले. मात्र मागील वर्षभरात गॅस सिलिंडरच्या किमती २२५ रुपयांनी वाढविण्यात आल्या. मात्र त्यात केवळ दहा रुपयांनी कपात केल्याने सरकार प्रती ग्राहकांमध्ये प्रचंड असंताेष आहे. दरात केवळ दहा रुपयांनी कपात करुन सरकार सर्वसामान्यांची चेष्टा करीत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे आधीच अनेकांचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी झाले आहे, अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशात महागाईतही वाढ होत असल्याने सर्वसामान्यांनी जगावे तरी कसे सवाल केला जात आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा दर ६४६ रुपये होता. मात्र यानंतर मागील तीन ते चार महिन्यात यात २२५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर १ एप्रिलपासून गॅस सिलिंडरचे नवीन दर लागू झाले त्यात केवळ दहा रुपयांनी कपात केली आहे. तर गॅस सिलिंडरवरील अनुदान देखील मोठ्या प्रमाणात कपात केले आहे. काहींच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणेच बंद झाले आहे. जानेवारीमध्ये गॅस सिलिंडरचे दर ७६४ रुपयांवर पोहचल्याने तब्बल १०० रुपयांनी यात वाढ झाली. फेब्रुवारीमध्ये ७८९, मार्चमध्ये ८७० आणि एप्रिलमध्ये ८९० रुपये झाले. एकंदरीत सहा महिन्यात गॅस सिलिंडरचे दर २२५ रुपयांनी वाढले तर केवळ दहा रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे ही एक प्रकारे सर्वसामान्यांची थट्टाच होय.

.........

गेल्या वर्षभरात २२५ रुपयांनी महागले गॅस सिलिंडर

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर ६४६ रुपये होते. जानेवारी २०२१ मध्ये यात शंभर रुपयांनी वाढ होऊन सिलिंडरची किंमत ७६४ रुपये झाली. फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी वाढ झाली. मार्चमध्ये गॅस सिलिंडरचे दर पुन्हा ८७० रुपये झाले. गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची भाववाढ सहा महिन्यात झाली. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आउट कंट्रोल होत आहे.

..........

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच गगनाला भिडल्या असून मागील सहा महिन्यात गॅस सिलिंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ८९० रुपयांचे गॅस सिलिंडर झाले असून तो केवळ दहा रुपयांनी स्वस्त करणे म्हणजे सर्वसामान्यांची थट्टा करण्यासारखे आहे.

- कविता मेंढे, गृहिणी

.............

नोव्हेंबर महिन्यात ६४६ रुपयांना मिळणार गॅस सिलिंडरसाठी आता चक्क ८९० रुपये मोजावे लागत आहे. गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांनी वाढ झाली असून महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ बसविताना चांगलीच दमछाक होत आहे.

- नेहा निणावे, गृहिणी

........

आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहे. त्यातच आता गॅस सिलिंडर दरवाढीचा भडका उडत असल्याने महिन्याचा खर्च करताना दमछाक होत आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किमती नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे.

- प्रियंका खोब्रागडे, गृहिणी

............

नोव्हेंबर २०२० - ६४६

डिसेंबर २०२०- ६४६

जानेवारी २०२१- ७६४

फेब्रुवारी २०२१- ७८९

मार्च २०२१- ८७०

एप्रिल २०२१- ८९०

..........................

Web Title: Increased by Rs 225 and reduced by Rs 10: Wow Ray cunning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.