गर्भातील कुपोषणाने वाढताय बालमृत्यू
By admin | Published: May 24, 2017 01:33 AM2017-05-24T01:33:30+5:302017-05-24T01:33:30+5:30
फुलण्याआधीच कोवळ्या कळ्यांना मृत्यूच्या दारात ओढवून नेले जात आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : फुलण्याआधीच कोवळ्या कळ्यांना मृत्यूच्या दारात ओढवून नेले जात आहे. गंगबाई स्त्री रूग्णालयात सुसज्ज नवजात शिशू अतिदक्षता कक्ष असले तरी येथे महिन्याकाठी १२ बालकांचा मृत्यू होतो. बालमृत्यू, अर्भक मृत्यूदर मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसाधारण वजनापेक्षा कमी वजनाची बालके जन्माला येतात. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात गंगाबाई स्त्री रूग्णालयात १ हजार ७५१ बालके जन्मताच कमी वजनाची होती. गर्भावस्थेतील असंतुलित आहाराने कमी वजनाची बालके जन्माला येतात. परिणामी येथील बाल व अर्भक मृत्यू दर वाढत आहे.
जिल्ह्यासाठी एकमेव स्त्री रूग्णालय म्हणजे बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय. या रूग्णालयात वर्षाकाठी ७ ते ८ हजार प्रसूती होतात. या रूग्णालयाला २०० खाटांचा दर्जा असला तरी गंगाबाई स्त्री रूग्णालयात दररोज आजच्या स्थितीत १९० रूग्ण असतात. परंतु २०० पैकी फक्त १२० खाटा असल्याने गर्भवतींना झोपण्यासाठी जागा राहात नाही. डॉक्टरांची कमतरता असल्याने कार्यरत असलेले डॉक्टर प्रत्येक रूग्णांकडे पाहिजे तेवढे लक्ष देऊ शकत नाही. बालकांची योग्य काळजी घेण्यासाठी या ठिकाणी बालरोग तज्ज्ञ नसल्याने येथे बालकांचा मृत्यू होतो. बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे बालमृत्यूदर पाहता शासनाने हा आकडा शुन्यावर आणण्यासाठी येथे नवजात अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आले. या ठिकाणी बालकांच्या देखरेखीसाठी एमबीबीएस डॉक्टरांची गरज आहे. परंतु वेळोवेळी मागणी करूनही तुटपुंज्या वेतनात काम करण्यासाठी एमबीबीएस डॉक्टर येत नसल्यामुळे या ठिकाणी बालकांच्या सेवेसाठी बीईएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. या रूग्णालयात बालरोगतज्ज्ञ स्त्री रोग तज्ज्ञांची कमतरता आहे. या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नाही. सन २०१६-१७ या वर्षात ७०९२ महिलांच्या प्रसूती झाल्या. त्यातील ५ हजार ३४१ बालके अडीच किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाची आहेत. त्या बालकांना सर्वसाधारण बालकांच्या वजनात मोजता येईल. परंतु अडीच किलो ते १८०० ग्रॅम वजनाची १ हजार ४३६ बालके जन्माला आली. तर १८०० ग्रॅम वजनापेक्षा कमी ३१५ बालके जन्माला आली. वर्षभरात जन्माला आलेल्या बालकांपैकी १७५१ बालके सर्वसाधारण वजनापेक्षा कमी वजनाची होती. महिला गर्भवती असतांनाच तिला संतुलीत आहार न मिळाल्यामुळे बाळ कुपोषित जन्माला आले. परिणामी त्या बालकांना वाचवायचे कसे हा प्रश्न डॉक्टरांच्या समोर उभा राहतो.
संपूर्ण यंत्रणा कामाला लावली तरी त्यातील काही बालके अत्यंत कमी वजनाची होती. शरिराची संपूर्ण वाढ न झाल्याने त्या बालकांचा शेवटी मृत्यू झाला. मातेच्या असंतुलीत आहारामुळे बालकांची पोटातच वाढ होत नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील बालमृत्यूचा आकडा वाढत आहे. जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असल्याने येथील बहुतांश लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिला गर्भवती असताना त्या आहाराकडे दुर्लक्ष करतात.
सकष आहार घेत नल्यामुळे गर्भातच बालके कुपोषित होतात. परिणामी बहुतांश बालके पोटातच मृत्यूमुखी पडतात. गंगाबाईत प्रसूतीनंतर झालेल्या बालमृत्यूपेक्षा गर्भातच मृत्यूमुखी पडणाऱ्या अर्भकांची (आयुडी)चीं संख्या जास्त आहे.
३० टक्के महिलांना रक्तक्षय
गर्भावस्थेतही भात-भाजी शिवाय दुसरा कोणताही आहार अनेक महिलांना मिळत नसल्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या जिल्ह्यातील ३० टक्के महिलांना अॅनेमिया (रक्तक्षय) असतो. गरोदरपणात योग्य काळजी घरचे मंडळी घेत नसल्यामुळे बालमृत्यू व माता मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असते. गंगाबाईत प्रसूतीसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांचे हिमोग्लोबीन ६ असते.
सकष आहार व वेळीच तपासणी करा
गोंदिया जिल्ह्यातील गर्भवती महिला संपूर्ण गर्भावस्थेचा काळ वांगेभातावर काढतात. गर्भवतींची प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यांना लोहयुक्त गोळ्या, कॅलशियमच्या गोळ्या घेणे आवश्यक असते. गर्भावस्थेत सकस आहार, सकाळी नास्ता, दुपारी जेवण, दुपारी ४ वाजता नास्ता, रात्री जेवण, फळे देणे आवश्यक असते. गर्भावस्थेत इन्फेक्शन, ताप आल्यास वेळीच डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक असते. परंतु गर्भावस्थेतही आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कुपोषित बाळ जन्माला घातले जात असल्याचे चित्र या गंगाबाईतील आकडेवारीवरून दिसून येते.