गोंदिया तालुक्यातच वाढताेय बाधितांचा आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:25+5:302021-03-05T04:29:25+5:30
गोंदिया : गोंदिया तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. मात्र गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधितांच्या ...
गोंदिया : गोंदिया तालुका वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे. मात्र गोंदिया तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि.४) आणखी याच तालुक्यात १५ बाधितांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा १२३ वर पोहाेचला आहे. त्यामुळे गोंदिया तालुकावासींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
गुरुवारी जिल्ह्यात २० कोरोना बाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक १५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १, आमगाव ३, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील चार तालुके पूर्वी कोरोनामुक्त होते. मात्र आता तालुक्यांमध्ये सुद्धा पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना जिल्ह्यात हळूहळू पुन्हा पाय पसरत असून नागरिकांचे थोडेही दुर्लक्ष पुन्हा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे सर्वांनी पुन्हा काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७१,८३७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५९,९७१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६८,८५० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२,६३१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४,५०० कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४,१४९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १६५ रुग्ण सद्यस्थितीत ॲक्टिव्ह असून ५३ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................