अपक्षांनी वेगळी चूल मांडल्याने सत्तेचे समीकरण बदलणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:00 AM2022-02-02T05:00:00+5:302022-02-02T05:00:03+5:30
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त्यामुळे या दोन सदस्यांचा मदतीने भाजप सहजपणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अपक्ष सदस्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपची अडचण थोडी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. यात सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. दोन अपक्ष सदस्यांच्या मदतीने ते गाठणे भाजपला शक्य होते; पण दोन अपक्ष सदस्यांनी वेगळी चूल मांडल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गोंदिया जिल्हा परिषद एकूण ५३ सदस्यीय आहे. या निवडणुकीत भाजपचे २६, काँग्रेस १३, राष्ट्रवादी काँग्रेस ८, चाबी ४, अपक्ष २ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. जे दोन अपक्ष सदस्य निवडून आले आहेत, ते भाजपच्या विचारधारेचे आहे. त्यामुळे या दोन सदस्यांचा मदतीने भाजप सहजपणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अपक्ष सदस्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने भाजपची अडचण थोडी वाढली आहे. त्यामुळे भाजप आता आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेची मदत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे; पण याला भाजप व विनोद अग्रवाल यांनीसुद्धा कुठलाच दुजोरा दिला नाही,
तर दुसरीकडे गोंदिया जिल्हा परिषदेचा इतिहास पाहता मोठा पक्ष सत्तेपासून दूर राहिला आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकूनही त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले होते. काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जाण्याऐवजी कमळ हातात घेत पाच वर्षे सत्ता उपभोगली हे जिल्हावासीयांनी अनुभवले आहे,
तर यावेळेस या सर्वच प्रमुख राजकीय पक्षाचे नेते काय भूमिका घेतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपला जि.प.च्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, चाबी आणि अपक्ष सदस्य एकत्रित येत सत्तेचे नवीन समीकरण तयार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे; पण हे जर तर पुरतेच मर्यादित आहे.
२५ फेब्रुवारीपूर्वी होणार अध्यक्षाची निवड
- जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही २५ फेब्रुवारीच्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. जि.प.अध्यक्ष पदासाठी भाजपकडून सध्या संजय टेंभरे आणि डॉ. लक्ष्मण भगत यांच्या नावाची चर्चा आहे; पण भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड नेमका काय निर्णय घेतो हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.