नक्षलवाद्यांशी लढणारी भारत बटालियन सात वर्षापासून नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:00+5:302020-01-05T06:00:15+5:30
सन २००९ मध्ये भारत राखीव बटालीयन २, राज्य राखीव पोलीस बल गट १५ बिरसी-गोंदिया या नावाने ६७५ युवकांची भर्ती करुन जवानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण नानविज पुणे येथे देण्यात आले. त्यानंतर निवासाची व्यवस्था गोंदिया येथे न झाल्याने ही बटालीयन प्रशिक्षणानंतर ठेवायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा या बटालियनचे तत्कालीन सेवानिवृत्त समादेशक कोसे यांनी बटालीयनची तात्पुरत्या स्वरुपात राज्य राखीव पोलीस बल गट १२ हिंगोली येथे राहण्याची व्यवस्था केली होती.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी व इतर कृत्यांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने शासनाने भारत बटालियन १० वर्षापूर्वी तयार केली. परंतु तयार झाल्यापासून ही बटालीयन गोंदियाच्या नावाने असूनही हिंगोली व नागपूर येथेच आहे. नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या बटालियनच्या जवानांना गोंदियात ठेवण्यापेक्षा अधिकारी आपल्या स्वार्थापोटी नागपूरातच ठेवत असल्याचे दिसते.
सन २००९ मध्ये भारत राखीव बटालीयन २, राज्य राखीव पोलीस बल गट १५ बिरसी-गोंदिया या नावाने ६७५ युवकांची भर्ती करुन जवानांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण नानविज पुणे येथे देण्यात आले. त्यानंतर निवासाची व्यवस्था गोंदिया येथे न झाल्याने ही बटालीयन प्रशिक्षणानंतर ठेवायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा या बटालियनचे तत्कालीन सेवानिवृत्त समादेशक कोसे यांनी बटालीयनची तात्पुरत्या स्वरुपात राज्य राखीव पोलीस बल गट १२ हिंगोली येथे राहण्याची व्यवस्था केली होती. या बटालीयनमध्ये गोंदिया व भंडारा येथील ३५० युवक आहेत. तर उर्वरीत युवक विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातील आहेत.
गोंदियातील कर्मचाऱ्यांना हिंगोली हे ५०० किमी. दूर होत असल्याने कोसे यांनी ही बटालीयन राज्य राखीव पोलीस बल गट ०४ नागपूर या ठिकाणी २७ जानेवारी २०१३ रोजी हलविली. तेव्हा पासून ही बटालीयन नागपूर येथे तात्पुरत्या स्वरुपात आहे. गोंदिया जिल्हा नक्षलदृट्या अतिसंवेदनशिल असल्याने नक्षलवाद्यांच्या बिमोडासाठी ही भारत बटालीयन उभारण्यात आली. नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी उत्पात केला, हिंसक घटना घडविल्या अशावेळी पोलिसांच्या मदतीला ही भारत बटालीयन नक्षलग्रस्त भागात जाऊन काम करणार होती. मात्र नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी उभारण्यात आलेली ही बटालीयन अधिकाऱ्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे ही नागपूरातच आहे.
या बटालीयनसाठी हक्काची सुसज्ज इमारत उभी असतानाही अधिकारी या बटालीयनला गोंदियात का घेऊन येत नाही हा मोठा प्रश्न आहे. अधिकाºयांचे वेतन सुरूच आहे, कर्मचाºयांनाही वेतन मिळत आहे. मात्र कवडीचे काम नसताना नागपूरात ही बटालीयन ठेवण्यामागील अधिकाºयांचा हेतू फक्त आपल्या स्वार्थापुरता आहे. अधिकारी नागपुरात स्थायीक झाल्याने आता ही बटालीयन नागपूरातून हलू नये असे त्यांचे प्रयत्न असतात. परिणामी ज्या उद्देशातून ही बटालीयन उभारण्यात आली त्या उद्देशाला तिलांजली देण्याचे काम या बटालीयनचे वरिष्ठ अधिकारी करीत असतात.
गोंदियाचा बुडतो २० लाखांचा रोजगार
भारत बटालियनमध्ये ९३९ अधिकारी-कर्मचारी आहेत. यात ३० अधिकारी, ६७५ पोलीस शिपाई, १६० हवालदार, १८ एएसआय, ५० अनुगामी कर्मचारी, ६ लिपीक आहेत. ही बटालियन १० वर्षापासून बाहेर आहे. जर गोंदिया येथे एवढे कर्मचारी आले तर २० लाख रुपये महिन्याची खरेदी गोंदिया शहरातून झाली असती. या जवानांमुळे परिसरातील जनतेला रोजगार मिळाला असता. ही बटालियन गोंदिया येथे लवकर यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
‘एचआरए’ कपात करा
इमारत नसल्यामुळे नागपूरात भारत बटालीयन ठेवली तेव्हापर्यंत ठिक आहे. परंतु ५५ कोटी खर्च करूनही या इमारतीत भारत बटालीयनला आणण्यासाठी अधिकारी नसतील तर सर्व अधिकारी कर्मचाºयांचे घरभाडे व सर्व भत्ते कपात करा. सोबतच ही बटालीयन गोंदियाला आणण्यासाठी काय अडचण आहे यासाठी कारणे दाखवा नोटीस वरिष्ठांनी बजाविण्याची गरज आहे.