हायरिस्कमधील व्यक्तींचे घरी जाऊन होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:46+5:302021-07-26T04:26:46+5:30
गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आता बोलले जात असून, ही लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला ...
गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आता बोलले जात असून, ही लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला जात आहे. यातूनच आता मोठ्या शहरांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यातही हायरिस्कमधील व्यक्तींसाठी ही सोय केली जात आहे. यामुळे जी व्यक्ती लसीकरण केंद्रांवर जाऊ शकत नाही त्यांची सोय होणार आहे. शिवाय, लसीकरणापासून कुणीही व्यक्ती सुटणार नाही. शासनाचा हा उपक्रम अत्यंत लाभदायी ठरणार असून, यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढणार असून, कुणीही व्यक्ती सुटणार नसल्याने प्रत्येकाची कोरोनापासून सुरक्षा होणार आहे. सध्या बिछाण्यावर असलेली किंवा वयोवृद्ध व्यक्ती लसीकरणासाठी जाऊ शकत नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत. अशात त्यांना जास्त धोका असून, अशांना हायरिस्कमध्ये गणले जात आहे. अशांना घरी जाऊन लसीकरण झाल्यास ते सुरक्षित होतील. मात्र, अद्याप जिल्ह्याला याबाबत आदेश आलेले नसल्याने घरोघर लसीकरणाला सुरुवात झालेली नाही.
----------------------
१) आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस -४४९५०३
दोन्ही डोस - ११३८८३
६० पेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस - ९२२०३
दुसरा डोस - ३२८७५
-----------------------------
हायरिस्कमध्ये कोण ?
अशी व्यक्ती जी बिछाण्यावरच पडून आहे व त्यांचे सर्व काही बिछाण्यावरच केले जात आहे. एखाद्या आजारामुळे किंवा वयामुळे जी व्यक्ती बिछाण्यावरून उठू शकत नाही किंवा घराबाहेर जाऊ शकत नाही. अर्धांगवायूने ग्रस्त असल्याने बिछाण्यावरच पडून असलेली व्यक्ती. अपघातामुळे सध्या बिछाण्यावर असलेली व्यक्ती, तसेच मानसिक आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हायरिस्कमध्ये गणली जाते.
------------------------------
मला लस कधी मिळणार?
मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नसल्याने घराबाहेर जाता येत नाही. मी पुतण्याजवळ राहत असून, ते आपल्या कामावर निघून जात असल्याने माझे लसीकरण झालेले नाही. अशात आमच्यासाठी लसीकरणाची काही सोय करता येणार आहे काय. जेणेकरून कोरोनापासून आमचा बचाव होऊ शकेल.
- शकुंतला पंधरवार (पदमपूर)
--------------------------
माझे वय झाल्यामुळे आता घराबाहेर निघता येत नाही. माझ्या घरी कुणीही नसल्याने मला लसीकरण केंद्रांवर जाता आले नाही व मला लस घेता आलेली नाली. कोरोनाबाबत ऐकूनच भीती वाटते, त्यामुळे घरी येऊन लस दिली जाणार काय.
- कामनबाई मौजे (पोवारीटोला)
------------------------------
अद्याप आदेश आलेले नाहीत
सध्या मोठ्या शहरांमध्ये घरोघर जाऊन लसीकरण केले जात आहे. मात्र, जिल्ह्यात अद्याप याबाबत आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यासाठी आदेश आल्यावर हायरिस्कमधील व्यक्तींना घरी जाऊन लस देता येईल.
- डॉ. भुमेश पटले
लसीकरण अधिकारी, गोंदिया.