व्यक्तीची विद्वत्ताच नेहमीच कामी येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:39 PM2017-12-22T21:39:59+5:302017-12-22T21:40:19+5:30
व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : व्यक्तीने शिक्षण घेऊन प्राप्त केलेली विद्वत्ताच नेहमीच कामात येते. शिक्षणामुळे अनेक अडचणीवर मात करणे शक्य असल्याचे मत जयंत शिक्षण संस्था आमगाव (रेल्वे)चे संस्थापक सचिव दिलीप मेश्राम यांनी व्यक्त केले.
पंचशील हायस्कुल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला येथे दोन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि. प. सदस्या लता दोनोडे, सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, ग्रा.पं.मक्काटोलाचे सरपंच रामप्रसाद दोनोडे, ग्रा. पं. कोटराच्या सरपंच मीरा नाईक, ग्रा.पं. कडोतीटोलाच्या सरपंच कल्पना मडावी, ग्रा.पं. गांधीटोलाचे सरपंच गजानन राणे, तंमुस अध्यक्ष पुरुषोत्तम कोरे, शाळा व्यवस्थापन समिती दुर्गूटोलाचे अध्यक्ष इशुलाल दोनोडे व प्राचार्य व्ही.डी. मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता शारदा माता, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली. वार्षिक क्रीडा महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या खो-खो, कबड्डी, नृत्य व विविध सांस्कृतिक व बौद्धीक स्पर्धा घेण्यात आल्या. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक आर. एम. मुनेश्वर यांनी केले.
याप्रसंगी लता दोनोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध पुस्तकांचे वाचन करुन वाचनाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले. प्राचार्य मेश्राम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून, देश सेवा करण्याचे आवाहन केले. संचालन शिक्षक एम. जी. कांबळे यांनी केले तर आभार प्रा. एम. जे. दिहारी यांनी मानले.