इंदोरा बु. आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात
By admin | Published: September 9, 2014 11:47 PM2014-09-09T23:47:53+5:302014-09-09T23:47:53+5:30
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अनेक समस्यांच्या विळख्यात हा आरोग्य केंद्र सापडला आहे.
मुरलीदास गोंडाणे - इंदोरा/बुज.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याशिवाय अनेक समस्यांच्या विळख्यात हा आरोग्य केंद्र सापडला आहे.
या केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून व्ही.आर. आईटवार कार्यरत आहेत. सदर केंद्रांतर्गत नऊ उपकेंद्रांचा समावेश असून ३३ कर्मचारी कार्यरत आहेत. यात पाच आरोग्य सेवकांची पदे रिक्त असून आरोग्य सहायकाचे एक पद रिक्त आहे. तसेच चार परिचारिकांची पदे मंजूर असून केवळ तीनच परिचारिका कार्यरत आहेत. एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. ही पदे भरण्यात आली नसल्याने केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागते.
शासनामार्फत या आरोग्य केंद्रात सहा खाटा मंजूर असून तशी व्यवस्था आहे. जेव्हा महिला प्रसुतीसाठी व कुटूंब कल्याणसाठी भरती झाल्यावर शस्त्रक्रियेनंतर जागेअभावी खाटा लावता येत नाही. प्रयोगशाळेची नवीन इमारत पावसामुळे गळत आहे. या खोलीमध्ये विजेची सोय नसल्याने औषधी वितरण कक्षात प्रयोगशाळेचा टेबल ठेवला आहे. महिलांसाठी नवीन वार्ड तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी स्लॅब गळत आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन मागील एक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे रूग्णांना ने-आण करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांना वाहनाअभावी मोठाच त्रास होतो. त्यासाठी तालुका स्तरावरून वाहन मागविण्यात येते. प्रसूतीसाठी दाखल महिलांना तीन दिवसपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जेवन दिले जाते. मात्र शस्त्रक्रियेच्या रूग्णांना आहार द्यावे, असे असतानाही येथील सुविधेअभावी आहार दिले जात नाही.
मलेरिया, डेंग्यूची तपासणी सध्या सुरू असून पी.एफ. सकारात्मक असल्यास त्यावर तत्काळ औषधोपचार केला जातो. मात्र पाच आरोग्य सेवकांच्या कमतरतेमुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागतो. या आरोग्य केंद्रात सोलर वॉटर सिस्टम बंद अवस्थेत आहे. जे उपकरण होते ते माकडांच्या हैदोसामुळे तुटले आहे. तेव्हापासून ते दुरूस्त करण्यात आले नाही. रूग्णांना पिण्याचे गरम पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रसूत मातांना त्रास सहन करावा लागतो.
या आरोग्य केंद्रात महिला वार्डांची कमतरता, ही मोठी समस्या आहे. महिलांचा एकच वार्ड असल्यामुळे प्रसूत व शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांना झोपण्याचा त्रास होतो. तसेच पुरूषांचासुद्धा एकच वार्ड असल्याने रूग्णांची गैरसोय होते.
कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी येथे क्वॉर्टर उपलब्ध असून संबंधित मुख्यालयी राहत आहेत. आरोग्य केंद्राला भेट दिली असता वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. आरोग्य सहायिका कांबळे उपस्थित होत्या. त्यांना विचारल्यावर अधिकारी गोंडमोहाळी येथे गेल्याचे सांगितले.