औद्योगिक वसाहती वांझोट्याच
By Admin | Published: August 13, 2016 12:06 AM2016-08-13T00:06:28+5:302016-08-13T00:06:28+5:30
जिल्ह्यातील पाच औद्योगिक वसाहतींपैकी (एमआयडीसी) चार वसाहती उद्योगांच्या प्रतिक्षेत्र अजूनही उदास पडलेल्या आहे.
प्लॉटधारकांची मनमानी : महामंडळाचे अधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या
मनोज ताजने गोंदिया
जिल्ह्यातील पाच औद्योगिक वसाहतींपैकी (एमआयडीसी) चार वसाहती उद्योगांच्या प्रतिक्षेत्र अजूनही उदास पडलेल्या आहे. गोंदियात काही प्रमाणात उद्योग दिसत असले तरी गोरेगाव, देवरी आणि अर्जुनी मोरगावमध्ये औद्योगिक वसाहतींच्या नावाखाली फक्त फलकच झळकत आहेत. उद्योगांअभावी वांझोट्या ठरलेल्या या औद्योगिक वसाहतींना ‘अच्छे दिन’ कशी येणार याची प्रतीक्षा तेथील नागरिकांना आहे.
गोंदियासह तिरोडा, देवरी, गोरेगाव आणि अर्जुनी अशा पाच औद्योगिक वसाहती जिल्ह्यात आहेत. त्यापैकी तिरोडा एमआयडीसीची २११ हेक्टर जिल्ह्यात एकमेव मोठा उद्योग असलेल्या अदानी वीज प्रकल्पाला देण्यात आली आहे. मात्र इतर चार वसाहती उद्योगांसाठी झुरत आहेत. ज्यांनी उद्योग लावण्याच्या नावावर एमआयडीसीमधील प्लॉट घेतले, बँकांकडून कर्जही घेतले त्यांचे किती उद्योग सुरू आहेत याच्या तपशिलात गेल्यास दिसणारे खरे चित्र फार वेगळे आहे. मात्र एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडूनच त्यांच्याकडे कानाडोळा करून एक प्रकारे नियमबाह्य कामांना अप्रत्यक्षपणे चालना दिली जात आहे.
काही एमआयडीसींच्या जागेवर तर अनेक वर्षांपासून काही बड्या लोकांनी अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. मात्र त्यांचे कोणीही काही वाकडे केले नाही. यामागचे रहस्य काहीही असले तरी ज्या उद्देशासाठी शासनाने ही कोट्यवधी रुपयांची जागा राखीव ठेवली आहे त्या जागेचा खऱ्या अर्थाने उपयोगच होताना दिसत नाही. ज्या उद्योगकांना एमआयडीसीमधील प्लॉट आवंटित केले आहेत त्यांनी स्वत:ल त्या जागेचे मालक समजून वाट्टेल तसा त्या जागेचा उपयोग सुरू केला आहे. परंतू त्यांना त्यापासून रोखण्याची किंवा त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत आतापर्यंत तरी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेली नाही. प्लॉटधारकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाकडे मनुष्यबळच नाही. नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयातून सर्व कारभार पाहिल्या जात असल्यामुळे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. यातून खऱ्या अर्थाने उद्योगाला चालना मिळण्याऐवजी प्लॉटधारकांनी दुसरेच ‘उद्योग’ सुरू केल्याचे दिसून येते.
गोंदिया एमआयडीसीमधील १८७ पैकी १७० प्लॉट्स आवंटित झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात १३६ प्लॉट्सवरच उद्योग सुरू झालेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या देवरीत ८४ प्लॉट्सपैकी ८३ प्लॉट्स उद्योगांसाठी आवंटित करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात केवळ ५ युनिट सुरू झाले. गोरेगाव एमआयडीसीमध्ये २४ प्लॉट्सपैकी १५ आवंटित करण्यात आले. पण त्यापैकी फक्त ५ चालू झाले. अर्जुनी मोरगाव एमआयडीसी तर आतापर्यंत नावालाच आहे. तेथील ११ हेक्टरमध्ये आतापर्यंत रस्तेसुद्धा विकसित केले नव्हते. मात्र गेल्या वर्षभरापासून तेथील अतिक्रमण हटवून आता तो परिसर विकसित करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही औद्योगिक विकास गरजेचा आहे.