चाचण्या कमी होताच संसर्ग नियंत्रणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:30 AM2021-05-08T04:30:20+5:302021-05-08T04:30:20+5:30
अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कोरोनाचा उद्रेक चांगलाच पहावयास मिळाला. मात्र, मागील १५ दिवसांपासून कोरोना संसर्ग नियंत्रणात ...
अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कोरोनाचा उद्रेक चांगलाच पहावयास मिळाला. मात्र, मागील १५ दिवसांपासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचा ऊहापोह होवू लागला आहे. यामागचे कारण काहीही असले तरी चाचण्या कमी होताच संसर्ग नियंत्रणात आल्याचे अनुभवास येवू लागले आहे. विशेष म्हणजे, आरोग्य संस्थात रॅट किटचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे प्रयोगशाळेकडे मोठ्या प्रमाणात नमुने प्रलंबित असल्याने आरटीपीसीआर चाचणीही रखडली आहे. अशा परिस्थितीत तापाच्या रुग्णांना चाचणीअभावीच रहावे लागत असल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी टेस्टिग, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या तिन्ही बाबींवर भर देण्याची गरज आहे. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात टेस्टींग आणि ट्रेसिंग या दोन्ही बाबी नावापुरत्याच सुरू आहेत. मागील महिन्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट पहावयास मिळाला असला तरी आजघडीला संसर्ग नियंत्रणात आल्याचा ऊहापोह होत आहे. यामागचे कारण आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना समोर केले जात असले तरी खऱ्या अर्थाने टेस्टिंग कमी होत असल्याने संसर्ग कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या ३३७ असून आतापर्यंत २२ बाधितांचे मृत्यू झाले आहेत. अनेक भागात रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी त्या भागांमध्ये चाचण्या त्या प्रमाणात होताना दिसून येत नाही. एप्रिलमध्ये उच्चांकी रग्ण सापडत असताना मे महिना उजाडला आणि रुग्णसंख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी आढळून आल्याचे वास्तव समोर आले आहे.
बॉक्स
कोविन ॲपमध्ये बदल करावा
कोविन ॲपद्वारे नागरिकांना कोणत्याही केंद्रातून लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अजूनही शहरी व ग्रामीण भागामध्ये इंटरनेटच्या सुविधा कमजोर आहेत. बहुसंख्य वेळा नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना नोंदणी करता येत नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारीसुद्धा नेटवर्कअभावी त्रस्त झाले आहेत. परिणामी लसीकरणासाठी नोंदणी करणे अवघड जात आहे. यामुळे ॲपमध्ये सुधारणा करण्यात यावी, मागणी केली जात आहे.