न.पं.चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:18 AM2021-07-24T04:18:44+5:302021-07-24T04:18:44+5:30
सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो ...
सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो रुपयांची कामे नगरपंचायत करीत असून, कामाचा दर्जा मात्र निकृष्ट स्वरूपाचा असल्याची चर्चा गावकरी करीत असून, त्यांची तक्रारही विनोद बारसागडे यांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांच्याकडे केली आहे.
शहरात १७ वाॅर्ड असून, ते वाॅर्ड नवीन लोकवस्तीचे आहेत. अशा ठिकाणी सिमेंट-काँक्रीटचे रस्ते व नाल्यांचे काम मंजूर झाले आहे. कंत्राटदारांनी लागणारे साहित्य आपल्या कार्यस्थळी टाकले आहे. ते साहित्य पाहून जाणकार नागरिक चर्चा करून लागले की, रेती आणि मातीमिश्रित आहे. गिट्टी ही पाचगावची सोडून अड्याल पहाडीची वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी ४० एमएम काही ठिकाणी २० एमएम यांचेतर संयुक्तीकरण जमत नाही.
सिमेंट काँक्रीटच्या पहिल्या थरामध्ये रेती जास्त व सिमेंट अगदी कमी वापरण्यात येत आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असला तर पुढे त्या रस्त्याची मर्यादा अतिशय कमी होईल. त्याकरिता बांधकामाचा दर्जा चांगला असावा, अशी मागणी होत आहे. सिमेंट रस्ते हे मशीनद्वारे करण्यात यावेत, अशीही मागणी नागरिक करीत आहेत. नगरपंचायतमध्ये चांगले दर्जेदार काम करायचे असेल, तर काँक्रीट मशीनद्वारेच रस्ते बनिवणे गरजेचे आहे; परंतु एकही सिमेंट रस्ता मशीनद्वारे करण्यात येत नसेल, तर त्या कामाची गुणवत्ता फार काळ टिकणारी नसेल. याकडे नगरपंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.
अधिकाऱ्यांचे मौन
बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे दर्जा सुधारण्यात यावा, अशी तक्रार करूनही नगरपंचायतचे अधिकारी मौन धारण करून बसले आहेत. यामुळे गावकऱ्यांत चर्चेला उधाण आले आहे. कदाचित नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे नगरसेवकांचे वर्चस्व नाही. त्यामुळेच दर्जा खालावला असेल.