निकृष्ट तांदळाचा पुरवठा; जिल्ह्यातील ३३ राईस मिल ‘ब्लॅक लिस्टेड’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:48 PM2023-08-09T13:48:58+5:302023-08-09T13:57:50+5:30
गोंदियातील तांदळावर बाहेर कारवाई, जिल्ह्यात मात्र केले जातेय दुर्लक्ष : दोन महिन्यांपूर्वीही सात राईस मिलर्स टाकल्या होत्या काळ्या यादीत
गोंदिया : निकृष्ट तांदळाचा पुरवठा केल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील ३३ राईस मिलर्सला तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केली, तर यापूर्वीदेखील देवरी तालुक्यातील सात राईस मिलर्सला तीन वर्षांकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात तांदूळ जमा करताना येथील तांदूळ गुणवत्ता अधिकारी तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ गोदामात जमा करतात; परंतु जमा केलेला हा तांदूळ दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यावर केंद्रीय पथकाच्या तपासणीत मानवास खाण्यास योग्य नसल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात ३३ राईस मिलर्सला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले. यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ४ ऑगस्टला दिले आहे.
गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाने गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धानाची भरडाईकरिता गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील राईस मिलर्सबरोबर करार केला जातो, पण राईस मिलर्सला भरडाईसाठी दिलेल्या धानाची काही राईस मिलर्स भरडाई न करता इतर राज्यांत धानाला जास्त भाव मिळत असल्याने त्या धानाची विक्री करतात. उत्तर प्रदेश राज्यातील तांदूळ विकत घेत गोंदिया जिल्ह्यात सीएमआरच्या नावावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमा करीत असल्याचे पुढे आले आहे. हाच तांदूळ स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांना देण्यासाठी बाहेर जिल्ह्यात पाठविला जातो.
स्वस्त धान्य दुकानात देण्यात येणारा तांदूळ हा खाण्यास योग्य आहे किंवा नाही याची जबाबदारी एफसीआयच्या केंद्रीय पथकाची आहे. केंद्रीय पथक जिल्ह्यातील स्वतः धान्य दुकानांना पुरविण्यात येणाऱ्या किंवा राईस मिलर्सकडून जमा केलेला तांदूळ गोदामात जाऊन पाहणी करतात. गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही जमा करण्यात आलेल्या तांदळाची गुणवत्ता केंद्रीय पथक तपासणी करीत असताना जिल्ह्यातील तब्बल ३३ राईस मिलर्सनी पाठविलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगत त्या राईस मिलर्सला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे.
गुणवत्ता अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
तांदूळ गुणवत्ता अधिकऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोंदियात हाच तांदूळ चालतो, तर तो तांदूळ बाहेरच्या जिल्ह्यात गेल्यावर खाण्यायोग्य राहात नाही. गोंदियातही खाण्यायोग्य तांदूळ नाही; परंतु पुरवठा विभागाच्या मूकसंमतीने खाण्यायोग्य नसलेला तांदूळ सर्रास दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
इतर जिल्ह्यांत पाठविलेला तांदूळ खाण्यायोग्य नाही
गोंदिया जिल्ह्यातील ३३ राईस मिलकडून विविध जिल्ह्यांत तांदूळ पाठविण्यात आला. त्यात बीड जिल्ह्यात पाठविलेल्या तांदळापैकी ३ राईस मिलर्सचा तांदूळ निकृष्ट आहे. लातूर जिल्ह्यात पाठविलेल्या तांदळात ११ राईस मिलर्सचा तांदूळ निकृष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाठविलेल्या तांदळापैकी १० राईस मिलर्सचा तांदूळ निकृष्ट आहे.
६ आठवड्यांत तांदूळ जमा करा, अन्यथा फौजदारी कारवाई
निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविणाऱ्या त्या ३३ राईस मिलर्स चालकांनी पाठविलेला तांदूळ निकृष्ट दर्जाचा पाठविला. त्याऐवजी उत्कृष्ट तांदूळ येत्या ६ आठवड्यांत जमा करावा, अन्यथा त्या राईस मिलर्सवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
- चिन्मय गोतमारे, जिल्हाधिकारी गोंदिया.