धान पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:32 AM2021-08-12T04:32:42+5:302021-08-12T04:32:42+5:30
केशोरी : या परिसरातील अजूनही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसून शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या भरवश्यावर धानाची रोवणी कशी बशी आटोपली. शेतकरी वर्ग ...
केशोरी : या परिसरातील अजूनही पावसाचे प्रमाण समाधानकारक नसून शेतकऱ्यांनी मोटारपंपाच्या भरवश्यावर धानाची रोवणी कशी बशी आटोपली. शेतकरी वर्ग यशस्वी झाला असला तरी धान रोवणी हिरवी होताच मागील पंधरा दिवसांपासून पाऊस न येता दमट वातावरण तयार झाल्यामुळे गादमाशी किडीला अत्यंत पोषक वातावरण मिळाल्याने धान पीकावर मोठ्या प्रमाणात गादमाशीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे धान उत्पादन कमी होण्याच्या धास्तीने शेतकरी चिंतातूर आहे.
गादमाशी ही लांब पायाची तपकिरी रंगाची उग्र वास सोडणारी किड असून गादमाशी धानाच्या आतील खोडात शिरुन धानाची अंकुर कुरतडून खाते. अंकुर कुरतडातांना तोंडातून सिसोडोजन नावाचे द्रव धानावर सोडत असते. त्या विषारी द्रवानी अंकुरणारा धान फुगून त्याला कांद्यासारखा धान पालवीचा पोंगा तयार होवून तो पोंका पिवळसर पांढरा रंगाचा असतो. त्या धानाला केव्हाच लोंबी येत नाही. परिणामी धान उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असते. धानाला लोंबीसाठी अनेक फुटवे फुटू शकतात. परंतु लोंबी तयार होत नाही. ही गादमाशी रोगाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या गादमाशी रोगांवर वेळीच नियंत्रण होणे अत्यंत गरजेचे आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करुन गादमाशी रोग नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली असून काही अनुभवी शेतकऱ्यांनी गादमाशीचा प्रादुर्भाव झालेल्या पीकावर युरियासारख्या खताचा वापर टाळावा, संतुलीत खताचा वापर करावा, गादमाशी नियंत्रणासाठी गादमाशी प्रतिकारक जातीच्या औषधाचा वापर करुन शक्यतोवर गादमाशी रोगांवर नियंत्रण ठेवावे असा सल्ला दिला आहे. प्रादुर्भाव झालेल्या गादमाशी या रोगाने या परिसरातील धान पीक धोक्यात येवून उत्पन्न कमी होण्याच्या धास्तीने शेतकरी वर्ग चिंतातूर झाल्याचे दिसून येत आहे.