Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 06:27 PM2020-05-30T18:27:44+5:302020-05-30T18:28:34+5:30
मागील दहा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (दि.३०) पुन्हा चार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात सुध्दा शनिवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ग्रामीण भागात वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र शनिवारी चार कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मुंबई, पुणे आणि इतर राज्यातील लोकांचे येणे सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढ आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे बाहेरुन जिल्ह्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा चार कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ६६ वर पोहचला आहे. मात्र शुक्रवारपर्यंत २८ आणि शनिवारी पुन्हा चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने जिल्ह्यात आता ३४ अक्टीव्ह रुग्ण आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णामध्ये १ देवरी तालुक्यातील तर ३ गोंदिया तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांपासून देवरी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे हा तालुका आत्तापर्यंत कोरोनामुक्त होता. मात्र शनिवारी देवरी तालुक्यात सुध्दा १ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोग्य यंत्रणेवरील ताण सुध्दा वाढला आहे.
३२ कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त
जिल्ह्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात शनिवारपर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र यापैकी शनिवारपर्यंत (दि.३०) एकूण ३२ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ही जिल्हावासीयांसाठी थोडी दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ३४ अक्टीव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून ते सुध्दा उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
माहिती लपविणाऱ्यांमुळे वाढला धोका
मुंबई, पुणे, दिल्ली या मोठ्या शहरांसह बाहेरील राज्यात रोजगार व इतर कामासाठी गेलेले नागरिक आता आपल्या जिल्ह्यात परतत आहे. मात्र हे जिल्ह्यात परतल्यानंतर याची माहिती जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला देत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. बाहेरुन येणारे नागरिक माहिती लपवित असल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत सुध्दा भर पडली आहे.