चान्ना परिक्षेत्रात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 05:00 AM2020-05-31T05:00:00+5:302020-05-31T05:00:36+5:30
ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील दोन तरुण अन्य ठिकाणच्या मित्रांसोबत काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने ते गावाकडे १५ मे रोजी आले. अरततोंडी येथील एक २२ वर्षीय तरूण मुंबई ग्रीन कॉटन येथून गावात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत येणाऱ्या ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील २ तरूण कोरोना बाधीत निघाल्याने गावात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली असून दोन्ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. दोन्ही गावच्या सीमा आवागमनासाठी सील करुन चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
परिसरातील ग्राम अरततोंडी व सिलेझरी येथील दोन तरुण अन्य ठिकाणच्या मित्रांसोबत काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने ते गावाकडे १५ मे रोजी आले. अरततोंडी येथील एक २२ वर्षीय तरूण मुंबई ग्रीन कॉटन येथून गावात आला.
ग्रामपंचायत पदाधिकारी व आपातकालीन समितीच्यावतीने त्या तरूणाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तर सिलेझरी येथील २० वर्षीय तरूण थेट राहत्या घरात जावून होम क्वारंटाईन झाला. सदर दोन्ही तरूण गडचिरोली व गोंदिया येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळाल्याने त्या दोन्ही तरूणांना अर्जुनी-मोरगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये बुधवारी (दि.२७) भरती करण्यात आले. दोन्ही युवकांचा तपासणी अहवाल प्राप्त होवून दोघेही कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे दोन्ही गावांसह परिसरात खळबळ माजली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना (बाक्टी) कार्यक्षेत्रातील गावांमध्ये दोन ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभाग जागे झाले असून शुक्रवारपासून कामाला लागल्याचे दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने अरततोंडी व सिलेझरी या गावांना कंटोनमेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून सीमा ये-जा करण्यासाठी त्वरीत बंद करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी शुक्रवारी (दि.२९) काढले.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाक्टीच्या कार्यक्षेत्रातील दोन गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने ग्रामीण भागात चिंतेचे सावट पसरले आहे. दोन्ही गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने सामान्य जनता आजतरी दहशतीखाली जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे. गावाजवळील गावांचा सुद्धा बफर झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.