ग्रामीण भागातही होऊ लागला शिरकाव ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:28 AM2021-04-17T04:28:55+5:302021-04-17T04:28:55+5:30
बोंडगावदेवी : परिसरातील गावखेड्यात कोरोना शिरकाव करीत आहे. गावातील जनतेने गाफील राहू नये, गावस्तरावरील ग्रामपंचायतच्यावतीने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या ...
बोंडगावदेवी : परिसरातील गावखेड्यात कोरोना शिरकाव करीत आहे. गावातील जनतेने गाफील राहू नये, गावस्तरावरील ग्रामपंचायतच्यावतीने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. संचारबंदीमध्ये घराबाहेर निघणे कदाचित अंगलट येऊ शकते. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र चान्नाच्या वतीने कोरोना चाचणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.१६) करण्यात आलेल्या तपासणीमध्ये गाव खेड्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्या पथकाखाली रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये परिसरातील २५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात गावाजवळील येरंडी, सिलेझरी, चान्ना, कान्होली, पिंपळगाव येथील ८ जण कोरोना बाधित आढळले. यापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये बोंडगावदेवी, खांबी, सिरेगाव, देऊळगाव या गावात सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. खांबी गाव कंटेनमेंट झोन यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. परिसरात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांना गृह विलगीकरण राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हातावर कमावून पानावर खाणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यावर महागडा औषधोपचार करु शकत नाही. घराच्या एका खोलीत विलगीकरण राहून आरोग्य सेविकांनी पुरवठा केलेल्या औषधावरच त्यांची भिस्त आहे. परिसरातील शासकीय दवाखान्यात त्वरित आवश्यक सोयी सुविधा पुरवून स्वतंत्र कोविड कक्ष सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
..............
सूज्ञ नागरिकांनी घरामध्येच राहावे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने घरामध्येच राहावे. संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचना तत्वांचा कोणताही भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. गावात निघालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घरामध्ये स्वतंत्र खोलीमध्ये राहावे, गावात इतरत्र न फिरता कोणाच्याही संपर्कात येऊ नये. काही लक्षणे दिसताच तपासणी करावी. घरापर्यंत येणाऱ्या कोविड कार्य पथकाला कुटुंबाची खरी माहिती द्यावी,कामाशिवाय घराबाहेर पडू नका, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी समस्त ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे बोंडगावदेवी ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा आनंदराव बोरकर यांनी कळविले आहे.