ग्रामीण भागातही लसीकरण चळवळीचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:20+5:302021-08-25T04:34:20+5:30
कपिल केकत गोंदिया : कोरोना प्रतिबंधक लसीला घेऊन कित्येकांचे मनात संभ्रम व भीती असल्याने लसीकरणाला सुरूवातीस प्रतिसाद कमी ...
कपिल केकत
गोंदिया : कोरोना प्रतिबंधक लसीला घेऊन कित्येकांचे मनात संभ्रम व भीती असल्याने लसीकरणाला सुरूवातीस प्रतिसाद कमी होता. मात्र लस सर्वांसाठी सुरक्षित असून लसीकरण शिवाय कोरोनाशी लढणे अशक्य असल्याचे लक्षात येताच लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून जिल्ह्याने आतापर्यंत ५५ टक्केपर्यंत लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकांकडून काहीच प्रतिसाद नसताना आता ग्रामीण भागातच शहरी भागापेक्षा जास्त प्रमाणात लसीकरण होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी (दि. २३) शहरात जेथे १६१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तेथेच ग्रामीण भागात तब्बल ५,६५२ नागरिकांनी लस लावून घेतली आहे.
१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र नवीनच असल्याने कित्येकांनी लसीला घेऊन काही ना काही संभ्रम नागरिकांच्या मनात निर्माण केली होती. परिणामी भीतीपोटी नागरिकांनी लस घेतली नाही. मात्र त्याचे पडसाद लगेच एप्रिल महिन्यातील दुसऱ्या लाटेच्या कहरात दिसून आले. यामुळे नागरिकांचे डोळे उघडले शिवाय आरोग्य विभागाने जनजागृती करून लोकांच्या मनातील भीती नाहीशी केली. परिणामी आता लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील ७,२८,३०३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
कोरोनाला पूर्णपणे मात देण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याने लसीकरणाची मोहीम आता लसीकरण चळवळ म्हणून जिल्ह्यात राबविली जात आहे. सोमवारी (दि. २३) सुमारे १३० केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. यामध्ये शहरातील १६१८ नागरिकांनी लस लावून घेतली तर ग्रामीण भागातील ५,६५२ नागरिकांनी लस लावून घेतल्याची नोंद घेण्यात आली आहे. यावरून ग्रामीण भागातही आता लसीकरण चळवळीचा शिरकाव झाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
----------------------
लसीकरणात तरूणच अग्रेसर
लसीकरणातील खास बाब म्हणजे, १८-४४ गटाला परवानगी देण्यात आल्यानंतर या गटातील तरूणाईच लसीकरणात अग्रेसर दिसून येत आहे. जिल्ह्यात या गटात आतापर्यंत २,७८,७२३ तरूणांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये २,३९,६४६ तरूणांनी पहिला तर ३९,०७७ तरूणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यात सोमवारची आकडेवारी बघितल्यास तब्बल ४,४५८ तरूणांनी लस घेतली असून यामध्ये ३,४५९ तरूणांनी पहिला तर ९९९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
----------------------------
दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष नकोच
जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात असल्यामुळे कित्येक नागरिक आता कोरोनाच नसल्याने लस घेण्याची गरज काय अशा संभ्रमात वावरत आहेत. मात्र आपल्या आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येकाने वेळीच आपले दोन्ही डोस घेण्यावर भर दिला जात आहे. मात्र त्यानंतरही आतापर्यंत फक्त १,६२,७६१ नागरिकांची दुसरा डोस घेतला आहे. यामुळे दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष न करता वेळीच तो घेण्याची गरज आहे.