भाजीपाल्याला लागला महागाईचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:45+5:302021-06-23T04:19:45+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी आल्याने राज्य शासनाने दुसऱ्यांचा लॉकडाऊन केला होता. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी आल्याने राज्य शासनाने दुसऱ्यांचा लॉकडाऊन केला होता. या काळात अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने याचा शेती व्यवसायाला फटका बसला होता. मात्र, आता जून महिन्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. गोंदिया आणि लगतच्या बालाघाट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले जाते. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कांदा व इतर भाज्या, फळे बाहेरील जिल्ह्यातून येथे विक्रीसाठी येत आहेत. लॉकडाऊननंतर सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आणि डिझेल, पेट्रोलचे सातत्याने वाढत असलेले दर लक्षात घेता भाजीपाला महागला असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात कांदे ३० रुपये किलो, तर बटाटे २५ रुपये किलो, टोमॅटो ३० रुपये, वांगे ३० रुपये किलो, पालेभाज्या १५-२० रुपये जुडी, भेंडी ६० रुपये किलो असे भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आता गृहिणींकडून पुन्हा एकदा कडधान्य, डाळींचा वापर वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढले असले तरी दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कमी दरानेच भाजीपाला विकावा लागत आहे. यात व्यापारीच मोठे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
------------------------
आज सर्वसामान्य माणसांना जगताना मोठी कसरत करावी लागत आहे. आठवड्याचा भाजीपाला घ्यायचे म्हटले तर २००-३०० रुपये लागतात. त्याऐवजी डाळींचा, कडधान्याचा अधिक वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात भाजीपाला व्यवस्थित येत नसल्यानेही कडधान्य जास्त वापरणे ठीक आहे.
- संध्या विश्वकर्मा (गृहिणी)
--------
आज भाजीपाला घ्यायला जाणे म्हणजे थैलीत पैसा व खिशात भाजीपाला अशी स्थिती आहे. त्यात अनलॉकनंतर आणखीच दर वधारल्याचे दिसत आहे. यामुळे आता भाजीपाला खाणे परवडणारे राहिले नाही. त्यामुळे कडधान्य खाणे जास्त परवडणारे ठरत आहे. यामुळे कडधान्यांचा समावेश होत आहे.
- सीमा बन्सोड (गृहिणी)
-------
बाजारात जिल्ह्यातील भाजीपाला कमी प्रमाणात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला हा महागला असल्याने त्यामुळे दर काहीसे वाढले आहेत.
-राजू देशमुख, भाजीपाला व्यापारी.
--------------
लोकांना असे वाटते की, भाजीपाला विक्रेत्यांकडून अधिक दराने भाजीपाला विकला जातो. मात्र, प्रत्यक्षात आम्हालाही जादा दराने खरेदी करावी लागते. स्वस्तात मिळाल्यास आम्हीही ग्राहकांना कमी दराने विकतो.
-राजेश येटरे, भाजीपाला व्यापारी.
-------
मी कारले, चवळी, वांग्याची लागवड केली होती. याला चांगला दरही मिळाला. मात्र, आता इथून पुढे लागवड केलेल्या भाजीपाल्याला चांगला दर मिळेलच याची खात्री नाही. शासनाने खतांचे, बियाणांचे दर कमी करायला हवेत.
-दसाराम बिसेन, भाजीपाला उत्पादक शेतकरी, मुंडीपार
-----------
भाजीपाला लागवड फायदेशीर ठरते. मात्र, कोरोना परिस्थितीत मजूर मिळत नव्हते. इतर कामातही अडचणी येत होत्या. यावर्षी धानाचे क्षेत्र कमी केले आहे. आता भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे विक्रीला भाजीपाला येईपर्यंत दर किती राहतो, हे सांगता येणार नाही.
-निहारीलाल दमाहे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, लोधीटोला