बाप्पांपुढे महागाईचे विघ्न...!
By admin | Published: August 22, 2015 12:20 AM2015-08-22T00:20:43+5:302015-08-22T00:20:43+5:30
दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत असताना आता गणपती बाप्पांपुढेदेखील महागाईचे सावट घोंगावत आहे.
लहान मूर्तीचे भाव स्थिर : मोठ्या मूर्तींच्या किमती ३० टक्क्यांनी वाढणार
गोंदिया : दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडत असताना आता गणपती बाप्पांपुढेदेखील महागाईचे सावट घोंगावत आहे. यंदा गणपतीच्या लहान मूर्तींच्या किंमतीत वाढ जरी संभवत नसली तरी मोठ्या मूर्तीच्या किमती मात्र ३० ते ४० टक्क्यांनी वाढणार आहे.
दरवर्षी जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. शहरातील गणेशोत्सवाची परिसरात ख्याती आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी गणपतीची मोठ्या प्रमाणावर स्थापना करण्यात येते. भाविकांची मागणी लक्षात घेऊन दरवर्षी मूर्तिकार गणपतीच्या मूर्ती तयार करतात. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघता, दरवर्षी मूर्तीच्या किमतीत वाढ होते. लहान मूर्तीसोबतच मोठ्या मूर्तींच्याही किमती दरवर्षी वाढतात. मूर्तीसाठी लागणारी माती व रंग याच्या किमतीमध्येदेखील दरवर्षी वाढ होते. त्यामुळे मूर्तिकारांना मूर्तींच्या भावात वाढ करावी लागते, असे येथील मूर्तिकारांनी ‘लोकमत’ला सांगितले. सन २०११ ते २०१३ या कालावधीत पीओपीच्या मूर्तींची संख्या घटली होती. भाविक मातीच्याच मूर्तींना पसंती देत होते.
त्यामुळे आमचा व्यवसायही चांगला चालायचा. मात्र अलिकडील दोन वर्षांत पुन्हा पीओपीच्या मूर्ती बाजारात येत असल्याने त्याचा दुष्परिणाम मातीच्या मूर्तींवर होत असल्याची खंत येथील मूर्तिकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरवर्षी मातीचे आणि रंगांचे भाव वाढतात. मात्र पीओपीच्या मूर्तींमुळे आम्हाला तोटा सहन करून मूर्तींची विक्री करावी लागते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बंदी असूनही पीओपीच्या मूर्तींची विक्री
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ फेब्रुवारी २०१३ ला एका आदेशान्वये पीओपीच्या मूर्ती तसेच रासायनिक रंग वापरण्यावर बंदी घातली आहे. असे असले तरी दरवर्षीच उत्सव सुरू होण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर मोठ्या प्रमाणावर पीओपीच्या मूर्ती बाजारपेठेत दाखल होतात. दिसायला सुंदर आणि स्वस्त राहत असल्याने त्याची विक्रीही होते. यादरम्यान, प्रशासनाकडून याविरुद्ध नाममात्र कारवाई केल्या जात असल्याचा अनुभव आहे.
गणेशोत्सवाची दूरवर ख्याती
गोंदिया जिल्ह्यासह शहरातील गणेशोत्सवाची परिसरातच नव्हे तर लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून एकाहून एक आकर्षक मुर्त्या व देखावे गणेशोत्सवानिमित्त तयार केले जातात. गणेशोत्सवात शहर दणाणून जाते व गणेशोत्सवाचे हे आकर्षण बघण्यासाठी लगतच्या राज्यातील नागरिक शहरात येत असतात.
गणेशाच्या देखणेपणाची भुरळ
मातीपासून बनविलेल्या मूर्तीच्या तुलनेत पीओपीची मूर्ती आणि तिच्यावरील रंगकाम अधिक देखणे राहत असल्याने भाविकांना या मूर्तींची दरवर्षीच भुरळ पडते. अशा मूर्तींपासून पर्यावरणाला धोका असला तरी त्याची पर्वा न करता पीओपीच्याच मूर्ती स्थापन करण्यावर भाविक भर देताना दिसतात. मात्र यावर आळा घालणे गरजेचे झाले आहे.
मूर्तिकारांपुढे मातीचा प्रश्न..
मातीची मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना खास प्रकारची माती गोळा करावी लागते. यासाठी खास मातीचा शोध घेऊन माती आणल्यानंतर तिला मूर्तीसाठी तयार केले जाते. नदीकाठच्या मातीला यात जास्त पसंती दिली जाते. मात्र आता मातीसाठीच मूर्तिकारांना भटकण्याची पाळी आली आहे. पाहिजे तशी माती मिळविण्यासाठी मूर्तिकारांची भटकंती होते. त्यानंतर तिच्यावर मेहनत घेऊन मूर्ती तयार करणे आता न परवडणारे होत असल्याचे मूर्तिकार सांगतात. मात्र पर्याय नसल्याने चालत आलेला व्यवसाय करावा लागत असल्याचेही ते बोलतात.