माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
By admin | Published: February 10, 2017 01:16 AM2017-02-10T01:16:30+5:302017-02-10T01:16:30+5:30
आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविताना यंत्रणांनी
विजयकुमार गौतम : विविध विषयांचा आढावा, विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
गोंदिया : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना राबविताना यंत्रणांनी त्याचा लाभ जलदगतीने व प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्यास होईल, असे प्रतिपादन पालक सचिव विजयकुमार गौतम यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात विविध विषयांचा आढावा घेताना गौतम बोलत होते.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिलकुमार श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
विकासाच्या प्रक्रि येत ग्रामीण रस्ते चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगून पालक सचिव गौतम म्हणाले, त्यामुळे परिवहन सेवा ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे पोहोचविण्यास मदत होईल. सोबतच ग्रामीण विकासाला चालना मिळेल. गोंदिया जिल्हा निसर्गाने समृध्द आहे. जिल्ह्यात ज्या विविध समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम करण्यात येईल. जिल्ह्यात पर्यटन विकासाला भरपूर वाव आहे. त्यामुळे पर्यटनातून रोजगार क्षमता वाढण्यास देखील मदत होणार आहे.
कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जिल्ह्याची वाटचाल करावयाची असल्याचे सांगून गौतम पुढे म्हणाले, आधार नंबरची सांगड बँक खात्याशी घालून मोबाईलशी सुध्दा जोडण्यात यावे. लाभार्थ्यांना यापुढे विविध योजनांचा लाभ देताना आधार हा महत्वाचा घटक राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतला कॅशलेस व्यवहारासाठी मशीन देण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या मशीनचा व्यवहारात उपयोग होताना दिसणार आहे. आधार ते डिजिटल एकॉनॉमी करणारा राज्यातील पहिला जिल्हा हा गोंदिया राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. १ एप्रिलपासून सर्वप्रकारच्या शिष्यवृत्ती डीबीटी पोर्टलवर जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना पॉश मशीन देण्यात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, जिल्ह्यात धडक सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत दोन हजार विहिरी मंजूर झाल्या आहेत. या विहिरींची कामे देखील सुरू झालेली आहेत. या विहिरीतून शेतीच्या बारमाही सिंचनाचे नियोजन कृषी विभागाने करावे. रबी हंगामात देखील या शेतीतून जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकांची शेती करतील व त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. संपूर्ण जिल्हा मार्चपूर्वी हागणदारीमुक्त होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालक सचिव यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा, अपूर्ण अवस्थेतील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. याप्रसंगी सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)