तेढा येथील मामा तलाव खोलीकरणाची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:37 PM2019-06-26T22:37:03+5:302019-06-26T22:37:47+5:30
जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे.
तेढा येथील मामा तलाव ९० एकर परिसरात पसरला आहे. या मामा तलावातून पांगोली नदीचा उगम झाला आहे. या तलावाचे खोलीकरण करून गाळ काढणे, पाणी क्षमतेनुसार पाळीला पिचींग व इतर कामांसाठी लघू पाटबंधारे विभागाने ५३ लाख २५ हजार रुपये मंजूर केले. मातीकाम खोदकाम हे २५ हजार घनमीटर होणार असून त्या कामाकरीता २९ लाख रु पये, पिचींग व इतर कामांसाठी ३४ लाख २५ हजार रु पये मंजूर झालेले आहेत.खोलीकरण कामाची सुरुवात जेसीबी यंत्राव्दारे करण्यात आली.परंतु लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता दिलीप चौरागडे यांनी कंत्राटदारासह संगणमत करुन मातीकाम खोदकाम वगळून गौणखनिज (मुरूम) खोदकाम केले आहे. ते मुरुम तेढा ते पठाणटोला मार्गावरील डांबरीकरण रस्त्यावरचे कठडे भरणकामाकरीता विकल्याचा आरोप वालदे यांनी केला आहे. तलावातील मुरूम खोदकाम करण्याकरीता कालव्याच्या मुख्यव्दारापासून १५ फुट अंतरावर ८ फुट खोल खड्डा करून खोदकाम केले आहे. त्यामुळे कालव्याव्दारे पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपसा होणार नाही.त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अभियंता,आ.राजकुमार बडोले, तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून वालदे यांनी केली आहे. एकीकडे अनेकांनी तलावाच्या जमिनीवर अतिक्र मण केले आहे. तर दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता हे शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाची चौकशी करुन शेतकºयांवरील अन्याय दूर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मामा तलाव खोलीकरण कामाची माती ग्रामपंचायतने सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी टाकली आहे. येथील मुरुम कोणत्या खडीकरण व बांधकामासाठी किंवा रस्तावरचे कठडे भरण्यासाठी नेण्यात आले याची माहिती आपल्याला नाही. आपल्यावर केलेले आरोप तथ्यहिन आहे.
- दिलीप चौरागडे
अभियंता लघु पाटबंधारे विभाग गोंदिया