चौकशी अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Published: October 24, 2015 01:53 AM2015-10-24T01:53:11+5:302015-10-24T01:53:11+5:30

प्रभारी खंडविकास अधिकारी एम.डी. धश यांनी जवरी येथील रोजगार सेवकाच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली.

Inquiry Officer | चौकशी अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात

चौकशी अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात

Next

उपोषणाचा इशारा : जवरीच्या रोजगार सेवकाच्या कामाची चौकशी दाबण्याचा प्रयत्न
आमगाव : प्रभारी खंडविकास अधिकारी एम.डी. धश यांनी जवरी येथील रोजगार सेवकाच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. ही चौकशी संशयाच्या भोवऱ्यात असून स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर चौकशी दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.
कामावर असलेल्या मजुरांकडून प्रतिआठवडा वीस रुपये वसूल केले जातात. आतापर्यंत कधीच रोजगार सेवकाने मस्टर वाचन केले नाही. सचिवाला विश्वासात घेऊन मस्टर वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबुलाल बुधराम गायधने हे मामा तलाव हनुमान मंदिर येथील बांधकामावर बैलबंडी सिमेंट नेण्याचा काम करीत होते. मात्र त्यांच्या भाड्याचे पैसे मिळाले नाही. धनराज हरी हटवार यांची बैलबंडीच्या नावावर बोगस हजेरी दाखवून हजेरी पट क्र. ३१५१ वर ४२० रुपये प्रमाणे पैसे काढण्यात आले. २५० रुपये प्रमाणे धनराय हरे हटवार यांनी गॅगमध्ये काम करुन पैशाची उचल केली. मात्र त्याच गँगमध्ये काम करणाऱ्या इतर मजुरांना १३५ रुपये रोजी मिळाली.
सन २०१३-१२ मध्ये रामलाल राखडे, कांता पाऊलझगडे, काशीराम वलथरे, माधोराव माऊरकर, ताराचंद बागडे, लक्ष्मण हत्तीमारे या मजुरांची अजूनपर्यंत रोजी मिळाली नाही. चंद्रकुमार भैयालाल गायधने यांनी माहितीच्या अधिकाऱ्याखाली नाला सरळीकरण सन २०१४-१५ च्या कामाची माहिती मागितली. त्यात मजुरांचे नाव गहाळ करण्यात आले. मस्टर क्र. २१२ ते २२० मध्ये रोजगार सेवक ग्रामसेवक, सहगट कार्यक्रम अधिकारी यांची स्वाक्षरी नाही. एम.बी. नंबर नाही. मात्र सर्व मजुरांचे पैसे काढण्यात आले.
विशेष म्हणजे रोजगार सेवक अशोक सिताराम गायधने यांचा भाऊ ग्रामपंचायतमध्ये सदस्य असल्याने सरपंच हे काही लोकांना घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. गावात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. गावात अशांतता पसरली आहे. गावातील वातावरण तापलेले आहे. कोणतीही अनैतिक घटना माहिती काढणाऱ्यांवर घडू शकते, अशी लेखी तक्रार पोलीस स्टेशनला १९ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.
एकंदरित चौकशी अधिकारी एम.डी. धस यांच्यावर गावकऱ्यांचा विश्वास नाही. ज्या तक्रारकर्त्यांनी त्यांची कोणतीच विचारपूस किंवा बयान घेण्यात आले नाही. उलट रोजगार सेवक अशोक गायधने यांनी चौकशी अधिकाऱ्याकडे आपल्या खास मर्जितल्या माणसाचे स्वत: बयान लिहून सादर केले. जवरी येथील अनेक कामात रोजगार सेवकाकडून अनियमितता आढळून आली आहे. मात्र लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकाला चौकशी अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. नगरातील एका स्थानिक नेत्याकडून दबाव तंत्राचा उपयोग करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप तक्रारकर्ते चंद्रकुमार गायधने, नंदलाल पाथोडे, छगनलाल मेंढे, श्यामराव हत्तीमारे, नरेश चोरवाडे यांनी केला आहे.
जर प्रकरण दाबून रोजगार सेवक अशोक गायधने याला वाचविण्याचा प्रयत्न झाला तर पंचायत समितीसमोर रोजगार सेवक व अधिकाऱ्यांविरुद्ध आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Inquiry Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.