जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी भंडाऱ्यात
By admin | Published: August 19, 2016 01:26 AM2016-08-19T01:26:25+5:302016-08-19T01:26:25+5:30
पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक महिन्यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते.
समस्या आरोग्याची : रासायनिक तपासणी अधिकाऱ्याचे पद रिक्त
गोंदिया : पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक महिन्यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. ही तपासणी जैविक व रासानिक अशा दोन प्रकारे केली जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात रासायनिक तपासणी करणारे अधिकारीच नाहीत. त्यामुळे येथील पाण्याच्या नमून्यांच्या रासायनिक तपासणी करण्यासाठी नमूने भंडारा येथे पाठविण्याची पाळी येते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्वच्छता व पाण्याच्या गुणवत्तेसाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करतो. मात्र संबंधित अधिकारी शासनाच्या प्रयत्नांवरच पाणी घातल आहेत. पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा तयार केली जाते. त्यात रासायनिक व जैविक अशा दोन भागात तपासणी केली जाते. जिल्ह्यातील प्रयोगशाळेत दर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे नमूणे तपासणीसाठी आणले जातात. परंतु रासायनिक प्रक्रियेने पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे नमूणे रासायनिक तपासणीसाठी भंडारा येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात.
जिल्ह्यातील प्रयोगशाळेत केवळ जैविक तपासणी केली जाते. शासनाने रासायनिक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत वरिष्ठ रासायनिक सहायक हे पद मंजूर केले आहे. हे पद मागील महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात रासायनिक तपासणी केली जात नसून पाण्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)
रासायनिक तपासणी
जलस्त्रोतांची तपासणी रासायनिक व जैविक प्रक्रियेने केली जाते. रासायनिक तपासणीत पीएच, कंडक्टीव्हिटी, क्षार, कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड, सल्फेट, नायट्रेट, लोह, जस्त, तांबे, पारा, आर्सेनिक, सेलेनियम, कॅडमियम, कीटनाशक व जंतुनाशक पाण्यातील स्त्रोतात तपासले जातात. सर्व जलस्त्रोतांचे नमूने ‘फिल्ड टेस्ट कीट’च्या माध्यमाने प्रयोगशाळेत आणले जातात. त्यांची तपासणी करून अहवाल ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला पाठविला जातो. पाण्यात रसायनांची मात्रा अधिक असली तर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न करण्याचा सल्ला दिला जातो.
जैविक तपासणी
जिल्ह्यातील प्रयोगशाळेत जैविक तपासणी होते. पाण्यात सूक्ष्म जीवांचे प्रमाण तपासण्यासाठी कोलीफॉर्म व फिकल कोलीफॉर्मचे प्रमाण तपासले जाते. पाण्याच्या नमून्यात एच टू एस वायलवर २४ ते ४८ तासांपर्यत ठेवले जाते. दरम्यान पाण्याच्या नमून्यांचा रंग काळा झाल्यास पाण्यात विषाणू असल्याचे स्पष्ट होते. जैविक तपासणीसाठी अनुजीव विभागाचे दोन पद मंजूर आहेत. त्यातील एक पद रिक्त आहे. कनिष्ठ वैज्ञानिकाचेही एक पद रिक्त आहे.