फुकट्या प्रवाशांनो सावधान; रोज १२० बसेसची तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 02:29 PM2021-09-27T14:29:44+5:302021-09-27T14:42:03+5:30
मागील वर्षी देशात कोरोना शिरला व पहिल्या लॉकडाऊनपासूनच राज्य रस्ते परिवहन महामंडळाला ग्रहण लागले आहे. अशात कित्येकदा प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न घेताच प्रवास करतात, त्यामुळे महामंडळाला नुकसान सहन करावे लागते.
कपिल केकत
गोंदिया : लॉकडाऊनमध्ये एसटी बंद असल्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका महामंडळाला बसला. त्यात एप्रिल महिन्यात आलेल्या लाटेमुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन करावे लागले. यामध्ये मात्र महामंडळाची कंबर मोडली असून महामंडळाला कित्येक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दुसऱ्या लाटेनंतर आतापर्यंत प्रवाशांकडून प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. मात्र सणासुदीत आता थोडीफार वर्दळ वाढली असून महामंडळाला थोडाफार दिलासा मिळत आहे. अशात कित्येकदा प्रवासी वाहकाची नजर चुकवून तिकीट न घेताच प्रवास करतात. अशाप्रकारे कित्येक प्रवासी असतात व त्यामुळे महामंडळाला तेवढे नुकसान सहन करावे लागते. मात्र आजघडीला अडचणीत असलेल्या महामंडळाला आता अशाप्रकारे होणारे नुकसान परवडणारे नाही. करिता महामंडळाने २२ सप्टेंबरपासून बसेसची तपासणी मोहीम सुरू केली आहे. यांतर्गत गोंदिया व तिरोडा आगारांत पथक दररोज बसेसची तपासणी करीत असून फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी ही कसरत सुरू आहे.
आतापर्यंत तिकीटधारकच आढळले
महामंडळाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारांत पथकांकडून तपासणी सुरू आहे. यात गोंदिया आगारात २ पथक तपासणी करीत असून त्यामध्ये ४ सदस्य आहेत, तर तिरोडा आगारात पर्यवेक्षक, कर्मचारी तपासणी करीत असून या पथकात ३ सदस्य आहेत. महामंडळाच्या आदेशानुसार, २२ सप्टेंबरपासून ही तपासणी सुरू असून हे पथक सुमारे १२० गाड्यांची तपासणी करीत आहे. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी तिकीटधारकच आढळल्याने आतापर्यंत तरी एकही कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड
पथकाकडून सुरू असलेल्या तपासणी अंतर्गत जर एखादा प्रवासी तिकीट न घेता प्रवास करताना आढळल्यास त्याला दंड केला जातो. यामध्ये त्या प्रवाशाने केलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यामध्ये जी रक्कम जास्त असेल तेवढा दंड आकारला जातो. मात्र या तपासणी मोहिमेंतर्गत आतापर्यंत तरी दोन्ही आगारांत दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही.
६ ऑक्टोबरपर्यंत मोहीम
महामंडळाच्या आदेशानुसार २२ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू असून येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत मोहीम सुरू राहणार आहे. मात्र सुदैवाने आतापर्यंत तरी पथकाला तिकीट न घेता प्रवास करताना एकही प्रवासी आढळलेला नाही.
- संजना पटले
आगार प्रमुख, गोंदिया