कृषी सहसंचालकांकडून सिमेंट बंधाऱ्याचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 12:44 AM2017-06-14T00:44:02+5:302017-06-14T00:44:02+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने पिंपळगाव-खांबी येथे बांधण्यात आलेल्या दोन नवनिर्मित
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने पिंपळगाव-खांबी येथे बांधण्यात आलेल्या दोन नवनिर्मित सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाची पाहणी विभागीय कृषी सहसंचालक विजय धावटे यांन केली. तसेच बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानमध्ये समाविष्ट असलेल्या पिंपळगाव-खांबी येथे गट क्रमांक १/५ व १/६ या दोन ठिकाणी नाल्याला अडवून सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
परिसरातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पाण्याची अडचण भासू नये म्हणून युद्धस्तरावर दोन्ही बंधाऱ्यांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जामध्ये पूर्ण करण्यात आले. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या दोन्ही सिमेंट बंधाऱ्याच्या बांधकामाची पाहणी विभागीय कृषी सहसंचालक विजय धावडे यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) हिंदूराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवार, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी एन.एम. मुनेश्वर, संजय रामटेके, कृषी पर्यवेक्षक आर.के. चांदेवार, कृषी सहाय्यक विश्वनाथ कवासे, अविनाश हुकरे उपस्थित होते.
५० हेक्टर जमीन होणार ओलीत
नव्याने बांधण्यात आलेल्या दोन्ही बंधाऱ्यामुळे नजीकच्या ५० हेक्टर शेतजमीनपर्यंतचे संरक्षित ओलीत होऊन भुजल पातळीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी भेटीदरम्यान विभागीय कृषी सहसंचालकांना दिली. पाण्याची साठवण क्षमता वाढल्याने शेतीसह गुरा-ढोरांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.