पालकमंत्र्यांनी केली अतिवृष्टीबाधित जरूघाटाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:20 AM2017-07-20T00:20:27+5:302017-07-20T00:20:27+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले.
शेती व घरांचे नुकसान : लांडगेच्या वारसाला चार लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी महसूल मंडळात १५ जुलै रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या गावातील अनेक कुटूंब अतिवृष्टीने बाधित झाले. याच मंडळात येत असलेल्या चिचोली येथील शेतकरी महेंद्र लांडगे हा शेतातून घरी येत असताना वाहून गेला. पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या केशोरी मंडळातील चिचोली, जरूघाटा व प्रतापगड या गावांतील शेतीची तसेच घरांची पाहणी करु न शाळेत व भक्तनिवास येथे आश्रयास असलेल्या कुटुंबांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोत जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कासीम जामा कुरेशी, माजी जि.प. सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे, जि.प. सदस्य तेजुकला गहाणे, पं.स. सदस्य अर्चना राऊत, रामलाल मुंगनकर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तहसीलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, प्रतापगड सरपंच इंदू वालदे यांची उपस्थिती होती.
चिचोली येथे पालकमंत्री बडोले यांनी मृत शेतकरी महेंद्र लांडगे यांची पत्नी वत्सला लांडगे हिचे सांत्वन करून नैसर्गिक आपत्ती अनुदानातून ४ लाख रूपयांचा धनादेश दिला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी जरूघाटा या गावाला भेट देवून पुष्पा लोगडे, मुन्ना तिवसकर व राजू तिवसकर यांच्या क्षतीग्रस्त घरांची पाहणी केली व गावातील चौकात उपस्थित ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. बाधित कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
जरूघाटा येथे ४० घरांचे अंशत: तर एका घराचे पूर्णत: नुकसान झाले असून हे नुकसान पाच लाख ८१ हजारांचे आहे. चिचोली-केशोरी रस्त्याची पाहणी करून अतिवृष्टीमुळे हा रस्ता खराब झाल्यामुळे तातडीने दुरूस्ती करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रतापगड येथील भक्त निवासात आश्रयास असलेल्या ईश्वर शेंडे, इभाकर झलिपे, मनोहर राऊत,शिनश्वर मडावी, विनायक उईके या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली.
पालकमंत्र्यांनी यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देवून अतिवृष्टीमुळे बाधित शेती व क्षतीग्रस्त घरांचे योग्य प्रकारे सर्वेक्षण करण्यात यावे. कोणताही बाधित शेतकरी तसेच क्षतीग्रस्त घरे नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.