गावकऱ्यांचा विरोध डावलून दारु दुकान सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:26 PM2018-10-01T21:26:07+5:302018-10-01T21:26:24+5:30
महिला आंदोलनाच्या पावित्र्यात : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील वार्ड क्रमांक १ मधील आठवडी बाजारात देशी दारुचे दुकान सुरु करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र यानंतरही उत्पादन शुल्क विभागाने नियमाला डावलून ३० सप्टेबरपासून दारु दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे गावातील महिलांमध्ये रोष व्याप्त आहे. दारु दुकान त्वरीत बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
३० सप्टेंबरला येथील वार्ड क्रमांक १ मधील आठवडी बाजारात देशी दारुचे दुकान सुरु केले आहे. हे दुकान या ठिकाणी सुरु करण्यात येऊ नये, म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या देवरी व गोंदिया येथील कार्यालयात गावातील नागरिकांनी लेखी निवेदन देऊन विरोध दर्शविला होता. एप्रिल २०१८ मध्ये वार्ड क्रमांक १ च्या नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज करुन तीव्र आक्षेप नोंदविला. मात्र यानंतरही ३० सप्टेबरपासून देशी दारुचे दुकान सुरू झाल्याने गावातील महिलांमध्ये रोष व्याप्त आहे.
गावात दारुचे दुकान सुरू झाल्यास गावातील वातावरण कलुषीत होवून भांडण तंट्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दारु दुकान सुरू करण्यास परवानगी देवू नये, असे पत्र दिले होते. मात्र यानंतरही उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने आश्चचर्य व्यक्त केले जात आहे. दारु दुकान सुरू झालेल्या परिसरातच वस्ती, अंगणवाडी आणि मंदिर सुध्दा आहे. तर कालवा लागून असल्याने गावातील महिला कपडे धुण्यासाठी तिथे जातात. मात्र दारु दुकान सुरू झाल्याने महिलांना सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
गावातील महिलांनी दारु दुकानाला विरोध केल्यानंतर त्यांना दारु दुकानदारांने पाहुन घेण्याची धमकी दिल्याचा आरोप महिलांनी निवेदनातून केला आहे.
दरम्यान रविवारपासून (दि.३०) गावात दारु दुकान सुरू झाल्याची माहिती महिलांना मिळताच शेकडो महिलांनी सरपंच अनिरुध्द शहारे यांच्याकडे धाव घेवून सदर दारु दुकान त्वरीत बंद करण्याची मागणी केली. तेव्हा शहारे यांनी सदर दारु दुकानास ग्रामपंचायतने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगितले. याची दखल घेत शहारे यांनी गावात सुरू केलेले देशी दारुचे दुकाने त्वरीत बंद करण्यात यावे.
अन्यथा गावातील महिला व गावकरी दारु दुकान बंद पाडतील यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा जिल्हाधिकारी आणि देवरी व गोंदिया उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
नाहरकत प्रमाणपत्र नाही तर दुकान कसे
गावात देशी दारुचे परवानाकृत दुकान सुरू करताना स्थानिक ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र लागते. त्या शिवाय दुकान सुरू करता येत नाही. मात्र नवेगावबांध ग्रामपंचायतने दारु दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र दिले नसताना उत्पादन शुल्क विभागाने या दुकानाला परवानगी कशी दिली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशी दारुचे दुकान सुरु करायला कुठलेही नाहरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतने दिले नाही. सदर दुकान ज्या इमारतीत सुरु झाले आहे. त्यांना निवासी कामासाठी ग्रामपंचायतने परवानगी दिली आहे. गावातील महिलांचा विरोध लक्षात घेता सदर देशी दारु दुकान त्वरित बंद करण्यात अशी मागणी केली आहे.
- अनिरुद्ध शहारे
सरपंच नवेगावबांध.
गावात दारु दुकान सुरु करण्याला महिलांनी सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. त्यासंबंधिचे लेखी निवेदन सुध्दा संबंधित विभागाला दिले आहे. मात्र यानंतरही दारू दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे हे दुकान त्वरीत बंद करण्यात यावे. अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन उभारू.
- डॉ. लता लांजेवार
रहिवासी प्रभाग क्रमांक १ नवेगावबांध