सीईओंनी दिले कारवाई करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:11 PM2018-07-05T22:11:18+5:302018-07-05T22:11:56+5:30
शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती.
अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील काही नामाकिंत इंग्रजी शाळांकडून शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात होती. बाजारपेठेतील दरापेक्षा अधिक दर आकारुन पालकांची सर्रासपणे लूट सुरू होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी याची दखल घेत परवाना न घेता पाठ्यपुस्तकांची विक्री करणाऱ्या शाळांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे खासगी इंग्रजी शाळा व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहे.
शहरातील काही खासगी शाळांनी शाळेतच पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य विक्रीची दुकाने थाटली होती. शाळेतूनच पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली. पाठ्यपुस्तकांची बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त दर आकारुन विक्री केली जात होती. काही पालकांनी याचा विरोध दर्शवित पाठपुस्तके शाळेत खरेदी करणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र खासगी शाळा व्यवस्थापनाने शाळेतून पाठपुस्तके घ्यायची नसतील तर तुमच्या पाल्याला आमच्या शाळेत शिकवू नका, असे उत्तर दिले जात होते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे नुकसान होवू नये म्हणून शांत राहण्याची भुमिका घेतली. खासगी शाळांकडून पाठपुस्तकांच्या नावावर सुरू असलेल्या लूटीचा मुद्दा लोकमतने लावून धरला.
खासगी शाळांना शाळेत पाठ्यपुस्तकांची विक्री करता येत का, शाळांकडे पाठपुस्तके विक्रीचा परवाना आहे का, पाठपुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करता येत का, या सर्व गोष्टींची सखोल माहिती घेतली. तेव्हा पाठ्यपुस्तकांची विक्री करण्यासाठी एकाही खासगी शाळेने नगर परिषद परवाना विभागाकडून परवाना घेतला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली. तर खासगी शाळांना शाळेतूनच पाठ्यपुस्तके घेण्याची सक्ती करता येत नाही. अशा शाळांवर शिक्षणाचा अधिकार कायद्यातंर्गत कारवाई करता येत असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाºयांना सांगितले. हे सर्व मुद्दे लोकमतने लावून धरल्यानंतर पालकांनी खासगी शाळांकडून होत असलेल्या लुटीविरोधात संताप व्यक्त केला. या विरोधात जिल्हाधिकाºयांना पाचशे पत्र पाठविण्याचा संकल्प पालकांनी केला. याची दखल घेत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी परवाना विभागाला पत्र देवून परवाना न घेता शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांची विक्री करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच अशा शाळांची यादी मागवून त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे खासगी शाळां व्यवस्थापनामध्ये खळबळ उडाली आहे.
सिंधू सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
शहरातील खासगी शाळांकडून पाठ्यपुस्तकांच्या सक्तीच्या नावावर सुरू असलेली पालकांची लूट थांबविण्यात यावी. तसेच या शाळांकडून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक शुल्कात वाढ केली जात आहे. यासर्व प्रकाराला प्रतिबंध लावण्यात यावे. या मागणीचे निवेदन सिंधू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. निवेदनातून खासगी शाळांकडून पालकांची होत असलेली लूट थांबवून कारवाई करण्याची मागणी केली. शिष्टमंडळात शहरध्यक्ष विनोद बसंतानी, देवानंद फेरवानी, दिलीप गोपलानी, राजकुमार नोतानी, राहुल लोहाना, राम नोतानी, अनिल ककवानी, विक्की बजाज, रवि वलेचा, श्याम लालवानी, गिरीश बिल्दानी, दिलीप तोलानी, अमर रामानी आदींचा समावेश होता.
शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका
शहरातीलच अनेक खासगी इंग्रजी शाळांकडून पाठ्यपुस्तकांच्या सक्तीच्या नावावर पालकांची लूट करीत आहे. याबाबत पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. काही पालकांनी याबाबतचे निवेदन जि.प.शिक्षण विभागाला दिले.मात्र त्यांनी अद्यापही एकाही खासगी शाळेला भेट देवून कारवाई केली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाप्रती पालकांमध्ये रोष व्याप्त आहे.