मातीच्या भांड्यातही इन्सुलीन व्हायल सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 09:39 PM2019-05-11T21:39:08+5:302019-05-11T21:39:57+5:30
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मधुमेह (डायबिटीज) च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदलती जीवनशैली आणि श्रम करण्याचे कमी होत चाललेले प्रमाण हे या मागील प्रमुख कारण आहे. आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात सुध्दा डायबिटीज रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात मधुमेह (डायबिटीज) च्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदलती जीवनशैली आणि श्रम करण्याचे कमी होत चाललेले प्रमाण हे या मागील प्रमुख कारण आहे. आदिवासीबहुल आणि ग्रामीण भागात सुध्दा डायबिटीज रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुठलाही आजार हा गरीब किंवा श्रीमंत व्यक्ती पाहुन होत नाही. डायबिटीजचे प्रमाण अधिक असणाऱ्या रुग्णांना इन्सुलीन घ्यावे लागते. इन्सुलीन व्हायल अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी फ्रीजची आवश्यकता असते. पण गोरगरीब रुग्णांना ते घेणे शक्य होत नाही. त्यांची हीच अडचण दूर करण्यासाठी शहरातील प्रसिध्द डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी यासाठी कुंभाराच्या मदतीने एक विशिष्ट प्रकाराचे मातीचे भांडे तयार केले आहे. यामुळे इन्सुलीन वायल सुरक्षित ठेवण्याची समस्या दूर झाली आहे.
डॉ. देवाशिष चॅटर्जी हे दिशा या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून मागील १९ वर्षांपासून आदिवासी बहुल व दुर्गम भागात आरोग्यसेवेचे कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून सालेकसा येथे दिशा आरोग्य कुटी स्थापन करुन आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करुन नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या सेवा कार्याला लवकरच २० वर्ष पूर्ण होत आहे. डायबिटीज हा आजार सध्या सर्वत्र झपाट्याने पाय पसरत आहे. बदलती जीवनशैली आणि यंत्र युगामुळे पूर्वीसारख्या शारीरिक श्रमाचे प्रमाण सुध्दा कमी झाले. त्यामुळे शरीराला ज्या प्रमाणात प्रोटीन व इतर पौष्टीकतत्व पाहिजे ते मिळत नाही. परिणामी इन्सुलीनची निर्मिती होत नाही.त्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे नवजात शिशुंना सुध्दा टाईप-१ चा डायबिटीज होत असून त्यांच्या पॅनक्रियाची वाढ होत नसल्याचे आढळले आहे. ग्रामीण आणि आदिवासीबहुल भागात आढळणारा डायबिटीज हा केवळ गोळ्या घेवून बरा होत नाही तर बरेचदा त्यासाठी इन्सुलीनच घ्यावे लागते. ग्रामीण आणि आदिवासीबहुुल डायबिटीज रुग्णांची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नसल्याने ते फ्रीज वगैरे घेऊ शकत नाही. पण इन्सुलीन वायल अधिक काळ सुरक्षीत ठेवण्यासाठी फ्रीजची आवश्यकता असते. हीच बाब ओळखून डॉ. देवाशिष चॅटर्जी यांनी कुंभाराकडून विशिष्ट प्रकारचे मातीचे भांडे तयार करुन घेतले. एक मोठ्या आकाराचे मातीचे भांडे आणि त्याच्या आत पुन्हा एक छोट्या आकाराचे भांडे तयार केले. त्या मोठ्या भांड्यात माती, कोळसा भरला आणि त्या माती व कोळशावर पाणी टाकले. तसेच आतील लहान भांड्यात इन्सुलीन वायल ठेवण्यासाठी जागा केली.
यामुळे हे मातीचे भांडे फ्रीज सारखेच काम करते. विशेष म्हणजे डॉ.चॅटर्जी यांनी या भांड्याच्या आतील आणि बाहेरील तापमानाची सुध्दा तुलना केली. विशेष म्हणजे भांड्याच्या आतील आणि बाहेरील तापमानात जवळपास १५ अंश सेल्सिअस तापमानाचा फरक आढळला. तर यात इन्सुुलीन वायल देखील अधिक काळ सुरक्षित राहत असून यासाठी फ्रीज असो वा नसो त्याचा फारसा पडत नाही. त्यामुळे गोरगरीब डायबिटीज रुग्णांची इन्सुलीन व्हायल अधिक काळ सुरक्षित ठेवण्याची मोठी अडचण डॉ.चॅटर्जी यांच्या प्रयोगामुळे दूर झाली आहे.
मातीचे भांडे तयार करण्यासाठी दोनशे रुपयांचा खर्च
डॉ.देवाशिष चॅटर्जी यांनी इन्सुलीन व्हायल ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकाराचे मातीचे भांडे कुंभाराच्या मदतीने तयार करुन घेतले.यासाठी त्यांनी बराच काळ अभ्यास केला. त्यानंतर स्वत: कुंभारासमोर बसून हे भांडे तयार करुन घेतले. त्यात माती,कोळसा टाकून आणि त्यातील आतील लहान भांड्यात इन्सुलीन व्हायल ठेवून ते फ्रीजसारखेच सुरक्षित राहतात किंवा नाही याची चाचपणी केली.त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. विशेष म्हणजे हे भांडे तयार करण्यासाठी २०० रुपयांचा खर्च असून ते फ्रीजपेक्षा सर्वसामान्य आणि गोरगरिबांना सुध्दा परवडण्याजोगे आहे.
गरजूंना नि:शुल्क मातीचे भांडे
सालेकसा येथे दिशा स्वंयसेवी संस्था दिशा आरोग्य कुटीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती करुन नि:शुल्क आरोग्य सेवा देण्याचे काम करीत आहे. आता या भागातील डायबिटीज रुग्णांना इन्सुलीन व्हायल ठेवण्यासाठी गरजू रुग्णांना नि:शुल्क मातीचे भांडे वाटप केले जात असल्याचे अध्यक्ष डॉ.देवाशिष चॅटर्जी यांनी सांगितले.