नुकसानभरपाई नाकारणाऱ्या विमा कंपनीला झटका
By admin | Published: January 3, 2016 02:20 AM2016-01-03T02:20:44+5:302016-01-03T02:20:44+5:30
वाहतुकीदरम्यान अवकाळी पावसाने खराब झालेल्या तांदळाची नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या ओरिएंटल इन्शरन्स कंपनीला ...
ग्राहक न्यायमंचचा निर्णय : ४५ हजार ३८६ रूपये देण्याचे आदेश
गोंदिया : वाहतुकीदरम्यान अवकाळी पावसाने खराब झालेल्या तांदळाची नुकसान भरपाई देण्यास नकार देणाऱ्या ओरिएंटल इन्शरन्स कंपनीला ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कारणमिमांसा केली व ४५ हजार ३८६ रूपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश सदर विमा कंपनीला दिले.
तक्रारदार शिवशंकर भगवानदास खंडेलवाल रा.तामखेडा (ता.जि. गोंदिया) असे ग्राहकाचे नाव आहे. बालाजी अॅग्रो प्रोडक्ट्स गोंदिया असे त्यांच्या फर्मचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या फर्मचा आठ लाख रूपयांचा विमा ‘मराइन कार्गो ओपन पॉलिसी’ १४ मे २००९ ते २८ फेब्रुवारी २०१० या कालावधीसाठी ओरिएंटल इंशुरंस कंपनी शाखा गोंदियाकडून घेतली होती. सदर पॉलिसीनुसार तक्रारकर्त्यास त्यांच्या फर्ममार्फत पाठविण्यात येणाऱ्या मालाची नुकसान भरपाईचा खर्च विमा कंपनी देण्यास बांधिल असेल, असे नमूद होते.
सदर फर्मने ८ नोव्हेंबर २००९ रोजी गोंदियावरून गांधीधाम कच्छ येथे मे. आंध्र-महाराष्ट्र रोडलाईन्स गोंदिया (ट्रक जीजे-१२/वाय-८४८०) या वाहनाद्वारे ८६८ पोती तांदूळ पाठविले होते. त्यात प्रत्येक पोतीमध्ये १९ किलो तांदूळ होते. या मालाच्या वाहतुकीपोटी २६ हजार ८८१ रूपये खर्च तक्रारदाराने दिलेला होता. परंतु माल वाहतुकीददरम्यान जोरदार अवकाळी पाऊस आले. त्यामुळे संपूर्ण माल व सदर धान्य भिजले व माणसांच्या खाण्यास अयोग्य ठरले.
या प्रकारामुळे तक्रारदार खंडेलवाल यांनी सदर विमा कंपनीकडे दोन लाख ६६ हजार १६७ रूपये नुकसान भरपाईची रक्कम मागितली. मात्र ही नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीने नकार दिला.
सदर नुकसानीबाबत खंडेलवाल यांनी तात्काळ विमा कंपनीस सूचित केले होते. त्या अनुषंगाने विमा कंपनीने सर्व्हेअर म्हणून जितेन ठक्कर यांची नियुक्ती केली. त्यांनी नुकसान भरपाईबाबत अहवाल तयार करून विमा कंपनीस पाठविला. विमा कंपनीने तो अहवाल स्वीकारला. त्या अहवालानुसार नुकसान भरपाईपोटी विमा रक्कम ४५ हजार ३८६ रूपये मिळण्यास पात्र ठरला. त्यामुळे तक्रारकर्त्याने जिल्हा ग्राहक मंचा येथे तक्रार योग्य त्या कागदपत्रांसह दाखल केली.
जिल्हा ग्राहक मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्र यांची पडताळणी केली. त्यानंतर निकाल जाहीर केला. त्यानुसार ओरिएंटल विमा कंपनीने तक्रारदारास सर्व्हेअरच्या अहवालानुसार रक्कम ४५ हजार ३८६ रूपये नुकसान भरपाई द्यावे तसेच मानसिक त्राापोटी तीन हजार रू्ये व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार रूपये द्यावे, असा आदेश दिला. सदर आदेश जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांनी पारित केले. (प्रतिनिधी)