व्याज अन् विलंब आकार माफ होणार; थकबाकीमुक्ती संधीला उरले ६८ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:13 PM2024-09-23T17:13:11+5:302024-09-23T17:21:02+5:30

महावितरणची 'अभय' योजना : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा

Interest and late charges will be waived; 68 days left for dues waiver opportunity | व्याज अन् विलंब आकार माफ होणार; थकबाकीमुक्ती संधीला उरले ६८ दिवस

Interest and late charges will be waived; 68 days left for dues waiver opportunity

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीची रक्कम एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरणच्या अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ होणाऱ्या या योजनेचा जिल्ह्यातील ग्राहक लाभ घेत आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना ९१ दिवसांसाठी म्हणजे १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबवत आहे. आता या योजनेच्या कालावधीला ६८ दिवस शिल्लक आहेत.


कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यात लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे किंवा मूळ थकबाकीची सुरूवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. 


येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ही योजना राबविली जाणार असून, यासाठी आता ६८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे अशात थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन वीज जोडणी करून घ्यावी व योजनेला लाभ घ्यावा, असे कार्यकारी अभियंता शैलेश कांबळे यांनी कळविले आहे. 


मागणीनुसार नवीन वीज जोडणीचा लाभ 
वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागा मालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, वीजबिलांच्या थकबाकी- मधून मुक्त होण्याची संधी महावितरणकडून देण्यात आली आहे. तसेच वीज ग्राहकांना मागणीनुसार नवीन वीज जोडणी देण्यात येत आहे.


२०,४१० ग्राहक पात्र 
जिल्ह्यात या योजनेंतर्गत २० हजार ४१० वीज ग्राहक पात्र आहेत. त्यांच्यावर १२ कोटी ७७ लाख रुपये एवढी मूळ थकबाकी आहे तर त्यावर एक कोटी ९८ लाख रुपये व्याज आणि विलंब आकार आहे. या ग्राहकांना योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याची चांगली संधी आहे


"महावितरणची वेबसाइट व मोबाइल अॅपद्वारे योजनेत सहभागी होण्याची व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा." 
- पुष्पा चौहान, मुख्य अभियंता, गोंदिया परिमंडळ


 

Web Title: Interest and late charges will be waived; 68 days left for dues waiver opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.