आता होणार परदेशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:31 AM2021-08-27T04:31:42+5:302021-08-27T04:31:42+5:30
कपिल केकत गोंदिया : शिक्षण किंवा व्यापाराला घेऊन कित्येकांना परेदशात मुक्कामी जावे लागते. अशात त्यांना परदेशात वाहन चालविण्यासाठी परवाना ...
कपिल केकत
गोंदिया : शिक्षण किंवा व्यापाराला घेऊन कित्येकांना परेदशात मुक्कामी जावे लागते. अशात त्यांना परदेशात वाहन चालविण्यासाठी परवाना लागतोच. मात्र यासाठी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागत असून त्याची मुदत सामान्यत: १ वर्षाची असते. अशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स मुदत संपल्यास व संबंधित परदेशात असल्यास त्यांची गैरसोय होऊ शकते. नेमकी हीच बाब धरून आता शासनाने परदेशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणाची सुविधा त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात करून दिली आहे. मात्र नागरिकांना याहीपेक्षा जास्त सुविधा परिवहन विभागाकडून पुरविली जात आहे. यासाठी संबंधित व्यक्तीला विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचा आहे. अशात त्यांना कोठेही न जाता इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण ऑनलाइन करवून घेता येणार आहे.
--------------------------------
कोरोना काळात संख्या घटली
वर्ष इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
२०१८--३
२०१९--५
२०२०--५
२०२१ (ऑगस्टपर्यंत)--३
------------------------------
असे काढा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स
१- इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्स, ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, मेडिकल सर्टिफिकेट द्यायचे आहेत.
२- विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट या कागदपत्रांसोबत द्यावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा व्हिसाचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच यासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागते.
३- त्यानंतर विभागाकडून संपूर्ण प्रक्रिया करूनच संबंधित व्यक्तीला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. विशेष म्हणजे यासाठी अन्यत्र कोठेही जाण्याची गरज नसते.
४- इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स देताना संबंधित व्यक्ती किती कालावधीसाठी परदेशात जात आहे हे बघून लायसन्स दिले जाते.
--------
कोण काढतो हा परवाना
सामान्यत: इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स सामान्य व्यक्ती काढत नाही, कारण त्यांच्या कामाचे ते नाहीच. मात्र आता परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिवाय कित्येकांचे व्यापार परदेशात असल्यास किंवा कामानिमित्त त्यांना परदेशात ये-जा करावी लागत असल्याने अशा व्यक्ती इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढतात. विशेष म्हणजे, व्यापारासाठी जाणारे नागरिक जास्त कालावधीसाठी जात नसल्याने अशांना १ वर्षांचा व्हिसा दिला जातो. व्हिसासोबतच इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपते. मात्र शिक्षणासाठी किंवा जास्त कालावधीसाठी जात असलेली व्यक्ती ५ वर्षांसाठी किंवा व्हिसा कधी संपतो त्यानुसार इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढतात.
-----------------------------
कोट
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची सुविधा आता त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात उपलब्ध करवून दिली जात असली तरीही प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करूनही त्यांना इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते. परदेशातील व्यक्तींसाठी अत्यंत सुविधाजनक मार्ग आहे.
- विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया